Poshir Dam Project Pudhari
रायगड

Poshir Dam Project: पोशीर धरण प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक; 17 मार्चला कर्जत प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा

1221 हेक्टर सुपीक जमीन पाण्याखाली जाणार; गावागावांतून शेतकरी व तरुणांचा आंदोलनाला वाढता पाठिंबा

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्रस्तावित पोशीर धरण प्रकल्पाचा वाद आता पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी कायमचा भूमिहीन होणार असल्याने, स्थानिक शेतकरी प्रणित मंडळ बोरगांव परिसर प्रणित पोशीर धरण हटाव समितीच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकरी एकवटत आक्रमक झाले असून, येत्या 17 मार्चला कर्जत प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोशीर धरण प्रकल्पातील 912 हेक्टर वनविभागाची तर 1221 हेक्टर जागा स्थानिक शेतकऱ्यांची आहे. ही 1221 हेक्टर सुपिक जमीन पाण्याखाली जाणार आहे.

सध्या या प्रकल्पाच्या हालचालींना प्रशासकीय पातळीवर वेग आला असला, तरी स्थानिक पातळीवर मात्र विरोधाची धार तीव्र झाली आहे. या प्रकल्पामुळे काही गावे आणि वाड्या बाधित होण्याची शक्यता आहे. यामध्ये बोरगांव, कुरुंग, उंबरखांड, भवानी पाडा, बोन्डेशेत, पेंढरी, भोपळे वाडी, चई, चेवणे, चाफेवाडी, आणि खांडस या गावांचा समावेश आहे. या गावांमधील सुपीक जमीन धरणाखाली जाणार असल्याने पिढ्यानपिढ्या शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी देशोधडीला लागेल,अशी भावना येथील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आहे.

विशेष म्हणजे, या आंदोलनात गावागावातील नवतरुण वर्ग मोठ्या संख्येने सामील होणार आहेत. धरण हटवा, शेतकरी वाचवा अशी मोहीम सध्या तालुक्यात जोरदारपणे राबवली जात आहे. या धरण प्रकल्पाचा लढा उभारण्यासाठी स्थानिक शेतकरी मंडळ बोरगांव परिसर प्रणित पोशीर धरण हटाव समिती स्थापन करण्यात आली आहे.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने कर्जतचे उपविभागीय अधिकारी (प्रांत), तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला अधिकृत निवेदन देण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना, शेतकरी संघटना व सर्व राजकीय नेत्यांनाही या आंदोलनाची माहिती देऊन पाठिंबा देण्याचे आवाहन हे पोशीर धरण हटाव समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. आता 17 मार्चला होणाऱ्या या मोर्च्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हा प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे. आम्ही आमची जमीन कदापि देणार नाही. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.
तानाजी चौधरी, अध्यक्ष, स्थानिक शेतकरी मंडळ बोरगांव परिसर प्रणित पोशीर धरण हटाव समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT