पोलादपूर शहर: पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरणातील पाणी शेती व स्थानिक वापरासाठी प्राधान्याने वापरण्यात यावे, तसेच महाड औद्योगिक वसाहतीतील कारखाने आणि बांधकाम व्यावसायिकांच्या पाणीवापरावर कठोर निर्बंध आणावेत, अशी येथील नागरिक आणि सामाजिक संघटनंकडून करण्यात येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेले अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार कपिल घोरपडे यांनी दिली.
पोलादपूर पंचायत समितीच्या बॅ. नाथ पै सभागृहामध्ये 'आमची माती आमची माणसे' सामाजिक संघटना आणि मनविसे यांच्या पत्रानुसार आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस तहसीलदार कपिल घोरपडे यांच्यासह उपसभापती अनिता भिलारे, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी व साक्षी कांबळेकर, तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे आणि पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती मांडताना सांगितले की, डोंगरमाथ्यावरील गावांना नदीपात्रातील वनराई बंधाऱ्यांचा कोणताही उपयोग होत नाही. तसेच खेड्यांमध्ये वृद्धांची संख्या अधिक असल्याने टँकरने पाणीपुरवठा झाल्यास भरलेली भांडी घरापर्यंत वाहून नेणे वृद्धांना अशक्य होते.
जलजीवन मिशन योजनेच्या अपयशाबाबत कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले असता, योजनेच्या सर्वेक्षणादरम्यानच त्रुटी निर्माण झाल्याची माहिती पंचायत समिती सदस्य अनिल दळवी यांनी दिली.
याशिवाय, रानबाजिरे धरणातील पाणी शेती व स्थानिक वापरासाठी प्राधान्याने वापरण्यात यावे, तसेच महाड औद्योगिक वसाहतीतील कारखाने आणि बांधकाम व्यावसायिकांच्या पाणीवापरावर कठोर निर्बंध आणावेत, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी लावून धरली.
पोलादपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यातील अडचणींबाबत संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांनी विचारणा केली असता, पीक पाहणी सर्वेक्षणासाठी सहाय्यकांची कमतरता भासत असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
तसेच तालुक्यात इ-केवायसी अभावी लाभार्थींच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा करता आला नसल्याचे सांगत या कामात सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदारांनी संघटनेला केले. कर्जतच्या धर्तीवर पोलादपूर तालुक्यातील लहूळसे गावातील प्रकल्पाबाबत राज पार्टे यांनी प्रश्न विचारला असता, हा १९८४ चा केंद्र सरकारचा प्रकल्प असल्याचे अनिल दळवी यांनी स्पष्ट केले, तर तहसीलदार घोरपडे यांनी या विषयावर भाष्य करण्यास आपण सक्षम अधिकारी नसल्याचे नमूद केले.
या संयुक्त बैठकीमध्ये 'आमची माती आमची माणसं' संघटनेचे संस्थापक राज पार्टे, मुंबई कमिटी अध्यक्ष निलेश कोळसकर, ग्रामीण अध्यक्ष हरि पवार, कार्याध्यक्ष विठ्ठल कळंबे, संदीप चव्हाण, मुख्य सरचिटणीस शिवाजी मालुसरे, संजय चोरगे, संजय कळंबे, नितेश शिंदे, अरुण मोहिते, श्रीधर नरे, लक्ष्मण कळंबे, गणेश गोगावले, अनिल बेलोसे, निलेश चाळके, अमित वाडकर आणि दीपक उतेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील दुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूरमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईची समस्या गंभीर बनते. तालुक्यातील काही दुर्गम वाड्या-वस्त्यांना दरवर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. यंदाच्या पावसाची स्थिती पाहता आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच पाणी नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
पाणीसाठ्याचे योग्य व्यवस्थापन, जलस्रोतांची देखभाल, विहिरींचे पुनर्भरण आणि पाण्याचा काटकसरीने वापर यावर भर देणे गरजेचे आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आतापासूनच ठोस उपाययोजना आखाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.