Poladpur Pedestrian Bridge Pudhari
रायगड

Raigad News | पोलादपूरच्या पादचारी पुलाला ‘स्पायरल लॅडर्स’; कोंढाणा चढल्यासारखा उभा जिना पाहून नागरिक संतप्त

काम थांबविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन; नागरिकांचा सुरक्षित जिन्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Poladpur Pedestrian Bridge

पोलादपूर : पोलादपूर शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर पूर्व व पश्चिमेकडील सर्व्हिस रोडवरील नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात येत असलेल्या पादचारी पुलाला जोडण्यात येणाऱ्या ‘स्पायरल लॅडर्स’वरून नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. अत्यंत अरुंद आणि उभ्या स्वरूपाचा हा जिना लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने त्याला विरोध होत आहे. याप्रकरणी पादचारी पुलासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या शहराध्यक्षा सारिका सनी विचारे यांनी तहसीलदार कपिल घोरपडे यांना निवेदन देऊन काम थांबविण्याची मागणी केली.

पोलादपूर शहरातील विविध वसाहती महामार्गाच्या पूर्व आणि पश्चिमेकडील सर्व्हिस रोडवर आहेत. रयत शिक्षण संस्थेचे विद्यामंदिर, जाखमातानगर, आदर्शनगर पश्चिम, हनुमाननगर, पार्टेकोंड, सावंतकोंड तसेच मंगलमूर्ती अपार्टमेंट या पश्चिमेकडील भागात, तर भैरवनाथनगर, प्रभातनगर पूर्व, डॉ. आंबेडकरनगर आणि रोहिदासनगर या वसाहती पूर्वेकडील भागात आहेत. या नागरिकांना महामार्गाच्या दोन्ही लेन ओलांडून ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.

पोलादपूर एसटी बसस्थानक परिसरात महामार्गावर यापूर्वीच पाच पूल बांधण्यात आले आहेत. तांबडभुवन, साईनाथनगर, सैनिकनगर रस्ता, गोकुळनगर रस्ता, खासगी इंग्रजी माध्यमाची शाळा तसेच पश्चिमेकडील सर्व्हिस रोडला जोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ दोन पूल, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपासून जुन्या पोलिस ठाण्यापर्यंत एक पूल आणि एसटी बसस्थानकातील वाहतुकीसाठी दोन पूल अशा पाच पुलांचा समावेश आहे. मात्र, पूर्व-पश्चिम भागातील नागरिकांसाठी स्वतंत्र पादचारी पुलाची मागणी कायम होती.

या मागणीसाठी विविध स्तरांवर पाठपुरावा करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरतशेठ गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्याकडेही मागणी करण्यात आली होती. नरवीर तानाजी मालुसरे रेस्क्यू अँड अ‍ॅडव्हेंचर्सच्या वतीने यासाठी रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सारिका विचारे यांनी पाठपुरावा केला. काही महिन्यांपूर्वी पुलाच्या कामाला सुरुवात होऊन गर्डर टाकण्यात आले.

मात्र, चार दिवसांपूर्वी पुलाच्या पूर्व व पश्चिम बाजूच्या सर्व्हिस रोडवर पादचाऱ्यांना पुलावर जाण्यासाठी ‘स्पायरल लॅडर्स’चा उभा जिना उभारण्याचे काम सुरू झाले. जिन्याची रचना पाहून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोंढाणा किल्ल्याच्या ताशीव कड्यावर चढल्याप्रमाणे हा जिना चढावा लागणार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटल्या. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

नागरिकांच्या वाढत्या विरोधाची दखल घेत सारिका विचारे यांनी तहसीलदार कपिल घोरपडे यांना लेखी निवेदन देत संबंधित काम थांबविण्याची मागणी केली. त्यानंतर दिवसभर युद्धपातळीवर सुरू असलेले ‘स्पायरल लॅडर्स’ उभारण्याचे काम थांबविण्यात आले.

काम थांबले असले तरी पादचारी पुलाचा जिना सर्व वयोगटातील नागरिकांना सहज आणि सुरक्षितपणे वापरता येईल, अशा पद्धतीने तयार करावा, अशी मागणी पोलादपूरकरांकडून होत आहे. दरम्यान, या पुलाजवळच नरवीर तानाजी मालुसरे रेस्क्यू टीमचे कार्यालय असल्याने ‘स्पायरल लॅडर्स’ची रचना कायम ठेवण्यात आली तर या पुलाला ‘नरवीर तानाजी मालुसरे पूल’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणीही पुढे आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT