Raigad Bribery Case : रायगडमध्ये एकाच दिवशी ५ जण एसीबीच्या जाळ्यात

उरण, अलिबागमध्ये सापळा रचून मंडल अधिकारी, २ तलाठी, २ कोतवालांना अटक; आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

उरण/अलिबाग : गेल्या महिन्यात रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वकीय सहाय्यकाला १.५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. सातबारा वारस नोंद व कागदपत्रांच्या मंजुरीसाठी लाच मागणाऱ्या उरण आणि अलिबाग तालुक्यातील तब्बल पाच महसूल कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी एसीबीच्या सापळ्यात पकडण्यात आले आहे. एकाच वेळी पाच जणांवर झालेली ही धडक कारवाई रायगडच्या इतिहासातील बहुदा पहिलीच घटना मानली जात आहे.

उरण तालुक्यातील मौजे चिरनेर येथील एका शेतकऱ्याने शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारसांची नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. ही नोंद करून देण्यासाठी कोप्रोलीचे मंडळ अधिकारी के. डी. मोहिते आणि चिरनेरचे तलाठी जयहिंद कोळी या दोघांनी संगनमताने तब्बल १ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार शेतकऱ्याने याविरोधात नवी मुंबई एसीबीकडे तक्रार नोंदवली.

Crime News
SKOCH Award 2026 : स्कॉच पुरस्कारावरून सरनाईक व पालिकेत जुंपली

एसीबीचे उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मागणीची पडताळणी करून मंगळवारी चिरनेर कार्यालयात गुप्त सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने झडप घालून संशयितांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान चिरनेरचे तलाठी जयहिंद कोळी हे प्रकृती ठीक नसल्याचे कारण सांगून तेथून निसटले, तर मंडळ अधिकारी व कार्यालयातील कोतवाल रंगेहाथ जाळ्यात सापडले. ताब्यात घेतलेल्यांना पुढील कारवाईसाठी उरण पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

कोप्रोलीचे मंडळ अधिकारी के. डी. मोहिते यांच्याविरोधात शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. साध्या नोंदींसाठी लाखो रुपये उकळणे आणि पूर्व भागातील अनधिकृत भरावांना अभय देण्यासाठी पैसे घेतल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. तसेच, २०२३-२४ मध्ये चिरनेर कार्यालयात काम करत असताना पगार मात्र पनवेल तालुक्यातील सजा पारगाव कार्यालयातून उचलल्याचे उघडकीस आले असून, त्यांच्या एकूणच आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Crime News
Maharashtra CM Srushti Yojana : राज्यात सीएम सृष्टी योजना, मुख्यमंत्री शौर्य पदकाने होणार पोलिसांचा गौरव

थळ-अलिबागमध्ये तलाठी, कोतवाल यांना रंगेहाथ अटक

जमिनीचे सातबारा उतारे, फेरफार नोंदी व इतर कागदपत्रे देण्यासाठी अलिबाग तालुक्यातील थळ सजा येथेही एसीबीने दुसरी कारवाई केली. थळ सजाचे ५० वर्षीय तलाठी अमृत चंद्रकांत चोगले आणि अलिबागच्या शिवाजीनगर येथे राहाणारा कोतवाल जितेंद्र हरिश्चंद्र पाटील यांनी कागदपत्रे देण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर विशेष पथकाने सापळा रचून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी अमृत चोगले व कोतवाल जितेंद्र पाटील यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, तलाठी अमृत चोगले हा काही वर्षांपूर्वी रेवदंडा सजा येथे कार्यरत असतानाही त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news