Poladpur Garbage Issue Pudhari
रायगड

Poladpur Garbage Issue: पोलादपूर नगरपंचायत हद्दीत कचऱ्यासह दूषित पाण्याचा गंभीर प्रश्न

सामाजिक संस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर: रायगड जिल्ह्यातील पोलादपूर नगरपंचायत हद्दीत सध्या कचऱ्यामुळे होणारी अस्वच्छता, दूषित पाणीपुरवठा आणि पर्यावरण प्रदूषणाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्याची तक्रार ‌‘आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था‌’तर्फे रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

संस्थेचे संस्थापक राज गणपत पार्टे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनमध्ये गळती होऊन दूषित पाणी नागरिकांना पुरवले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.

शहरात प्लास्टिक कचरा खुलेआम टाकला जात असून, गुरे व इतर प्राणी तो खात असल्याचे निदर्शनास आले आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.

सदर समस्या पोलादपूर नगरपंचायत प्रशासन, नगराध्यक्ष आणि संबंधित नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे उद्भवल्याचा आरोप संस्थेने केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्या करण्यात आल्या आहेत.

नागरिकांच्या मागण्या

कचरा तात्काळ उचलून स्वच्छता मोहीम राबवावी, पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनची तात्काळ दुरुस्ती करून शुद्ध पाणीपुरवठा करावा सांडपाणी व्यवस्थेची दुरुस्ती करून दूषित पाणी मिसळणे थांबवावे, नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवावी, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींवर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT