Ballaleshwar Temple Development: पालीच्या श्री बल्लाळेश्वर मंदिराचा होणार कायापालट; 28 कोटींचा विकास आराखडा

मंदिराचा दर्शनी भाग अधिक होणार खुला; भव्य रुप ठळकपणे दिसणार
Ballaleshwar Temple
Ballaleshwar TemplePudhari
Published on
Updated on

शरद निकुंभ

पाली: अष्टविनायकांपैकी जागृत देवस्थान, लाखो भाविकांची श्रद्धास्थान आणि सुधागड तालुक्याची ओळख असलेल्या बल्लाळेश्वर मंदिराचा लवकरच व्यापक कायापालट होणार असून, अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत या तीर्थक्षेत्रासाठी तब्बल 28 कोटी 40 लाखांचा भरघोस निधी मंजूर झाल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी दिली.

यामुळे भाविक, ग्रामस्थ, व्यापारी आणि वारसाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मंदिराचे संरक्षण, सुशोभीकरण, सुविधा वाढ आणि धार्मिक पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Ballaleshwar Temple
Maharashtra Teacher job: राज्यातील 30,000 शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार

या निधीच्या प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यानंतर मंत्रालयात या निधी संदर्भातील पत्र प्रदान करण्यात आले. या वेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला औपचारिक स्वरूप मिळाले. लवकरच या कामाचा शुभारंभ सोहळा पाली येथे पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या घडामोडीमुळे पालीत उत्साहाचे वातावरण आहे. या वेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या गीता पालरेचा, पालीचे नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर, नगरसेवक आरिफ मणियार तसेच बल्लाळेश्वर देवस्थानचे सरपंच जितेंद्र गद्रे व उपसरपंच वैभव आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.

विकास आराखड्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मंदिराची दृश्यमानता वाढवण्याचा प्रस्ताव आहे. मंदिरासमोरील पाणपोई, दुकाने व अडथळा ठरणाऱ्या शेजारील इमारती हटवून त्या ठिकाणी पायऱ्या व दर्शनबारी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिराचा दर्शनी भाग अधिक खुला होणार असून, अनेक वर्षांनी बल्लाळेश्वर मंदिराचे मूळ भव्य रूप अधिक ठळकपणे दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे.

रुग्णचिकित्साकेंद्राकडून येणारा मार्गही अधिक रुंद करण्यात येणार असल्याने भाविकांना प्रवेश अधिक सुलभ होणार आहे. यात्राकाळात आणि गर्दीच्या दिवसांत याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Ballaleshwar Temple
Powai Crime Case: पवईत 3 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; जन्मदात्या पित्यासह आजोबांविरुद्ध गुन्हा दाखल

मुख्य मंदिरासोबत धुंडीविनायक मंदिराची वास्तुशैली अनुरूप बांधणी केली जाणार असून, मंदिराच्या दोन्ही बाजूंना लावलेली छते काढून मूळ मंदिराची दृश्यमानता वाढवली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मंदिर समूह अधिक सुसंगत आणि आकर्षक स्वरूपात उभा राहणार आहे.

प्रकल्पात दर्शनरांग व्यवस्थापन, भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था, माहिती फलक, मंदिर व परिसरातील फरशा, विद्युतीकरण, अग्निरोधक यंत्रणा, कुंडाची साफसफाई व दुरुस्ती, नवीन तीन प्रवेश कमान उभारण्यात येणार आहेत. पूर्व , पश्चिम आणि उत्तर कमान असणार आहे आणि मंदिराच्या ओवऱ्यांचे पारंपरिक साहित्य वापरून बांधकाम अशा अनेक कामांचा समावेश आहे.

लाकूड, दगड, चुना व धातू वापरून पारंपरिक शैलीत उभारण्यात येणाऱ्या या कामांमुळे मंदिराचा वारसा अबाधित राहणार असून, भाविकांना अधिक भव्य व सुबक दर्शन अनुभव मिळणार आहे. सुधारित प्रस्तावात नवीन कार्यालयीन इमारत आणि मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर छत उभारण्याची तरतूदही आहे. कमी जागेचा जास्तीत जास्त वापर आणि आधुनिक गरजा लक्षात घेऊन कार्यालयीन इमारत पद्धतीने, मात्र मंदिराच्या वास्तुशैलीशी सुसंगत उभारण्यात येणार आहे.

पालीच्या भवितव्याशी निगडित प्रकल्प

या प्रकल्पामुळे केवळ मंदिरच बदलणार नाही, तर संपूर्ण पालीच्या धार्मिक पर्यटन, स्थानिक व्यापार आणि अर्थकारणाला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लाखो भाविकांच्या आगमनामुळे स्थानिक दुकानदार, प्रसाद विक्रेते, भोजनालये, निवास व्यवस्था आणि इतर पूरक व्यवसायांनाही याचा लाभ होऊ शकतो.

वाढीव दरांमुळे सुधारित अंदाजपत्रक

दर्शनबारी व धुंडीविनायक मंदिराच्या बांधकामात मुख्यत्वे दगड व लाकडाचा वापर होणार असल्याने वाढीव दरांचा परिणाम सुधारित अंदाजपत्रकात दिसत आहे. वन विभागानुसार लाकडाचे दर, पुरातत्व खात्याच्या कोटेशननुसार दगडाचे भाव, तसेच पॉलिशऐवजी व पॉलिशचा वापर यामुळे प्रकल्पाच्या रकमेत बदल झाल्याचे समजते.

भाविकांमध्ये कुतूहल

या आराखड्याची माहिती समोर आल्यानंतर भाविकांमध्ये एकच चर्चा रंगू लागली आहे, मंदिराचा दर्शनी भाग किती खुला होणार? धुंडीविनायक परिसराचे नवे रूप कसे असेल, नवीन प्रवेशकमान कशी असेल, मंदिराची भव्यता आणखी किती खुलणाऱ्या प्रश्नांनी कुतूहल वाढले आहे. अष्टविनायक यात्रेतील महत्त्वाचे केंद्र असलेल्या पालीसाठी हा प्रकल्प धार्मिक वारसा, भाविक सुविधा आणि पर्यटन विकास यांचा संगम ठरणारा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. वारसा जपत आधुनिक सुविधांचा मेळ घालणाऱ्या या विकास आराखड्यामुळे श्री क्षेत्र पालीच्या इतिहासात नवे पर्व सुरू होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news