Pen Tourist Spot Ban Pudhari
रायगड

Pen Tourist Spot Ban: पेणमधील प्रमुख धबधबे, पर्यटनस्थळांवर बंदी कायम

संभाव्य पूर, दरड कोसळणे अपघातांचा धोका; प्रतिबंधात्मक आदेश लागू; तरुणाई मात्र निराश

पुढारी वृत्तसेवा

कमलेश ठाकूर

पेण: रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड/ऑरेंज अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातही सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संभाव्य पूर, दरड कोसळणे व अपघातांचा धोका लक्षात घेऊन पेणचे उपविभागीय दंडाधिकारी प्रवीण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये पेण तालुक्यातील धोकादायक पर्यटनस्थळांच्या परिसरात ९ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार अतिवृष्टीमुळे सखल भागात पूरस्थिती, नद्या-नाल्यांना पूर, दरड कोसळणे तसेच धबधबे व धरण परिसरात पर्यटक अडकण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे.

या निर्बंधमुळे मात्र पेण तालुक्यातील तरुणांई निराश झाली आहे. तरुणांईला पावसाळा आणि वाहणारे धबधबे याचे फार मोठे आकर्षण असते. जेव्हा पावसाळे असतात तेव्हाच धबधबे असतात आणि तेव्हा मात्र ह्या धबधब्यावर जाऊ नये असे आदेश निघतात. आदेश संपेपर्यंत पावसाळ्यातील वाहणारे धबधबे कमी होत जातात. त्यामुळे तरुणांईला फिरायला पावसात भिजायला जायला मिळत नाही. म्हणून ही तरुणाई मात्र निराश झाली आहे.

पेण पोलीस ठाण्याने सादर केलेल्या अहवालानुसार मोतीराम तलाव, शहापाडा धरण, हेटवणे धरण, आंबेघर धरण, व्याघेश्वर धबधबा (कासमाळ) तसेच इतर नैसर्गिक पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असून, निष्काळजीपणामुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे मानवी जीवित व सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत.

या आदेशानुसार धबधबे व धरण परिसरात मद्यपान, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश, सेल्फी, रिल्स किंवा कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण, खोल पाण्यात उतरणे, धबधब्याच्या वरच्या भागात जाणे, धोकादायक पाण्याच्या प्रवाहात बसणे, बेदरकार वाहनचालक, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशी वाहनांची पार्किंग, महिलांची छेडछाड, मोठ्या आवाजात डीजे, स्पीकर व ध्वनीवर्धकांचा वापर तसेच प्लास्टिक, काचेच्या बाटल्या व इतर कचरा टाकून प्रदूषण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय स्थानिक प्रशासनाने प्रतिबंधित घोषित केलेल्या क्षेत्रात प्रवेश करणे, सुरक्षा बॅरिकेड्स किंवा कुंपण ओलांडणे यालाही मनाई करण्यात आली आहे. तसेच मोतीराम तलाव, शहापाडा, हेटवणे, आंबेघर धरण आणि व्याघेश्वर धबधबा (कासमाळ) यांच्या एक किलोमीटर परिसरात अत्यावश्यक सेवा, शासकीय यंत्रणा व आपत्कालीन सेवांची वाहने वगळता इतर सर्व वाहनांच्या प्रवेशावर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

आदेश केवळ पेण तालुक्यात धबधब्यावर

प्रतिबंध केले असले तरी काही तरुण तरुणी छूप्या मार्गाने या ठिकाणी जात आहेत. उंचावरून खाली पडणाऱ्या धबधब्यावरून खाली घसरत येण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर खाली पाणी साठलेले आणि प्रवाही असले तरी त्यात उड्या मारण्याचा मोह करीत आहेत. प्रशासनाने केवळ प्रतिबंध आदेश जरी केले असले तरी याठिकाणी प्रतिबंध करण्यासाठी पोलीस यंत्रणा तयार असायला हवी असे नागरिकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT