Mangaon Indapur Bypass: गणेशोत्सवापूर्वी बायपास होणार सुरू; मंत्री आदिती तटकरेंकडून कामांची पाहणी

संबंधितांना दिले निर्देश
Mangaon Indapur Bypass
Mangaon Indapur BypassPudhari
Published on
Updated on

माणगाव: कोकणवासीयांच्या मनात गेली १७ वर्षे रुतून बसलेल्या एका प्रश्नाला अखेर उत्तर मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुप्रतीक्षित माणगाव–इंदापूर बायपास प्रकल्पाची राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.

या पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्याशी सविस्तर चर्चा करत कामाचा आढावा घेतला आणि येत्या गणेशोत्सवापूर्वी किमान एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करावीच, असे ठाम निर्देश दिले. "आता कोणत्याही कारणासाठी विलंब खपवून घेतला जाणार नाही," असा स्पष्ट इशाराच त्यांनी यंत्रणांना यावेळी दिला.

Mangaon Indapur Bypass
LPG Cylinder Truck Accident: गॅस सिलेंडर भरलेला ट्रक पलटी; सावरोली,खारपाडा मार्गावरील घटना,मोठा अनर्थ टळला

कोकणात जाणाऱ्या-येणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी हा बायपास केवळ एक बांधकाम प्रकल्प न राहता, एका सामूहिक वेदनेचे प्रतीक बनला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे वाहन चालकांना खड्डेयुक्त रस्ते, दाट धुरळा, सततची वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका सहन करावा लागत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात तर ही समस्या अक्राळविक्राळ रूप धारण करते, जेव्हा लाखो चाकरमानी आपल्या मूळ गावी परतण्यासाठी याच मार्गावरून प्रवास करतात. नेमक्या याच पार्श्वभूमीवर मंत्री तटकरे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन कामाचा वेग तपासला, ही बाब नागरिकांच्या दृष्टीने दिलासादायक ठरली आहे.

Mangaon Indapur Bypass
Rural Roads: जन्मापासूनच नवजात बालकाचा खडतर प्रवास

गेल्या १७ वर्षांत अनेक सरकारे आली-गेली, अनेकदा मुदती जाहीर झाल्या, पूर्णत्वाची आश्वासने दिली गेली, मात्र प्रत्यक्ष कामाचा वेग कधीच अपेक्षेप्रमाणे राहिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते.

आताच्या पाहणीने आणि दिलेल्या ठाम शब्दाने नागरिकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असल्या, तरी भूतकाळातील अनुभवांमुळे "बोलाचाच भात, बोलाचीच कढी" ठरू नये, अशी भावनाही अनेकांच्या मनात कायम आहे.

गणेशोत्सवापूर्वी किमान एक मार्गिका खुली करण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सुरळीत प्रवास मिळवून देणे हीच शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

- आदिती तटकरे , मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news