

खोपोली: सावरोली-खारपाडा मार्गावर कुंभिवली येथे शनिवारी सकाळी गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ट्रकमध्ये तब्बल ३५० भरलेले एलपीजी सिलेंडर असल्याने क्षणभर मोठ्या स्फोटाची भीती निर्माण झाली होती.
मात्र सुदैवाने एकाही सिलेंडरला गळती न लागल्याने संभाव्य भीषण दुर्घटना टळली आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
ट्रक चावणे येथून ३५० भरलेले एलपीजी सिलेंडर घेऊन सावरोली-खारपाडा मार्गे पुण्याकडे जात होता. कुंभिवली परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्ता सोडून खाली खड्ड्यात पलटी झाला. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही दुकानांच्या गाळ्यांचे नुकसान झाले. तसेच वीज वितरणाचे खांब कोसळल्याने विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले असून कुंभिवली गावाच्या पाणीपुरवठा पाइपलाइनलाही फटका बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच उमेश गायकवाड यांनी तत्काळ खालापूर पोलिस आणि महावितरणला कळविले. पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सुरक्षित केला.
संभाव्य धोका लक्षात घेऊन हेल्प फाउंडेशनचे गॅस व केमिकल तज्ज्ञ धनंजय गीध यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी सर्व ३५० सिलेंडरची तपासणी करून एकाही सिलेंडरमधून गॅस गळती होत नसल्याचे स्पष्ट केले.
त्यानंतरच प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. दरम्यान, कोणताही अनर्थ घडू नये म्हणून महावितरणकडून तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. पोलिसांनी परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवत वाहतूक काही काळ नियंत्रित केली.