Pen Ganesh idol export Pudhari
रायगड

Pen Ganesh idol export: पेणच्या गणेशमूर्तींचा निर्यातीचा समुद्र प्रवास सुरू; 4 लाख गणेशमूर्ती परदेशात पोहोचणार

वार्षिक उलाढाल 100 ते 150 कोटी

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप,कमलेश ठाकूर

पेण: संपूर्ण जगाला भुरळ घालणाऱ्या गणेशनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पेण मधील गणेशमूर्तींचा परदेशातील प्रवास आता वेगाने सुरू झाला आहे. दरवर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात सुरू होणारी ही निर्यात यंदा आखाती देशांमधील युद्धस्थितीमुळे काही काळ रेंगाळली होती.

मात्र, आता मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएमपीए) बंदरातील वाहतूक कोंडी सुटल्याने गेल्या महिनाभरापासून बाप्पाच्या मूर्ती विविध देशांकडे मार्गस्थ होत आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुमारे चार ते साडेचार लाख गणेशमूर्ती परदेशात सुखरूप पोहोचतील, असा विश्वास पेणमधील गणेशमुर्तीकारांनी व्यक्त केला आहे.

वार्षिक उलाढाल 100 कोटींच्या पार

पेण तालुक्यात सद्यस्थितीत 500 पेक्षा अधीक गणेशमूर्ती कार्यशाळा कार्यरत असून, येथे प्रतिवर्षी एकूण 15 ते 16 लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात. या अवाढव्य गणेशोत्सव व्यवसायातून पेण तालुक्यात प्रतिवर्षी सुमारे 100 कोटी रुपयांची प्रचंड आर्थिक उलाढाल होते. या व्यवसायावर स्थानिक अर्थव्यवस्था, मूर्तीकार आणि हजारो कारागिरांचे कुटुंब अवलंबून आहे.

परदेशात पर्यावरणपुरक गणेशमुर्तींचीच निर्यात

एकूण उत्पादनापैकी दरवर्षी 4 लाख गणेशमूर्ती परदेशात निर्यात केल्या जातात. या मूर्ती कच्च्या माती आणि शाडू मातीपासून बनवलेल्या (पर्यावरणपूरक) असतात. अमेरिका, जपान, थायलंड, रशिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि भूतान या देशांमध्ये या पारंपरिक आणि सुबक मात्र केवळ पर्यावरणस्नेही मूर्तींनाच परवानगी असते. उर्वरित 11 ते 12 लाख मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून तयार केल्या जातात, ज्या देशांतर्गत बाजारपेठेसाठी आणि इतर राज्यांत पाठवल्या जातात.

युद्धस्थितीमुळे निर्यातीला बसला होता ब्रेक

गेल्या दोन महिन्यांपासून आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जेएनपीए बंदरावर मोठा ताण आला होता. कंटेनर निर्यात बंद होती. याच बंदरातून कांदे, द्राक्षे, केळी, आंबे, तांदूळ आणि गहू यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. या मालाची वाहतूक आखाती देशांच्या मार्गाने होत असल्याने बंदरामध्ये जहाजांची आणि कंटेनर्सची प्रचंड कोंडी (ट्रॅफिक जाम) झाली होती.

याचा थेट फटका गणेशमूर्तींच्या निर्यातीला बसला. युद्धस्थिती थोडी शिथिल झाल्यानंतर, गणपतीमुर्तींचे कंटेनर स्विकारण्यास प्रारंभ झाला आणि महिन्याभराच्या विलंबाने बाप्पाच्या मूर्तींसाठी जेएनपीएचे मार्ग खुले झाले. मार्च-एप्रिलची ही नेहमीची वेळ हुकल्यामुळे आता मे अखेरपर्यंत मूर्ती पाठवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सुरक्षेची परिपूर्ण काळजी आणि पॅकिंग

परदेशात जाणाऱ्या गणेशमूर्तींची निर्मिती पेणमधील कार्यशाळांमध्ये जवळपास पूर्ण झाली आहे. समुद्रमार्गे प्रवास करताना मूर्तींना कोणताही धक्का लागू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. पुठ्ठ्यांचे बॉक्स, कागद आणि कागदाचा सुका लगदा वापरून या मूर्ती अत्यंत सुरक्षितपणे पॅक केल्या जातात.

या बॉक्सवर संबंधित देशाचे नाव टाकून ते टेम्पोद्वारे जेएनपीटी बंदरात पाठवले जातात. तेथे एका मोठ्या कंटेनरमध्ये सुमारे 5 ते 6 हजार मूर्ती व्यवस्थित रचून त्या जहाजाद्वारे मार्गस्थ केल्या जातात. जहाजाद्वारे गणेशमुर्तींची निर्यात यंदा मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरु राहाणार आहे.

आखाती संकटानंतर आता निर्यात पूर्वपदावर आमच्या दीपक कला केंद्रामधून गेली 15 वर्षे सातत्याने 20 हजार गणेशमूर्ती थायलंड, बँकॉक, मलेशिया, भूतान, अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये निर्यात केल्या जातात. यंदा आखाती देशांमधील संकटामुळे महिनाभराचा विलंब झाला, पण आता आम्ही आमच्या मूर्ती परदेशात पाठवण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत आणि त्यानंतरही आमची पाठवणी सुरू राहील. जून-जुलैपूर्वी या 4 लाख मूर्ती त्या-त्या देशांच्या बंदरांवर पोहोचतील आणि तिथून स्थानिक भाविकांच्या घराघरांमध्ये पोहोचतील.
- दीपक समेळ, ज्येष्ठ गणेशमूर्तीकार तथा संचालक, दीपक कला केंद्र, पेण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT