Ganesh Idols File Photo
रायगड

Pen Ganesh Idol Business: पेणचा गणेशमूर्ती उद्योग 100 कोटींचा टप्पा गाठणार; पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींच्या मागणीत २५ टक्क्यांनी वाढ

यंदा पेणमधील गणेशमूर्ती निर्मिती आणि विक्रीची एकूण उलाढाल १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता मूर्तिकार आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

रायगड: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील गणेशमूर्तींची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण तालुक्यातील मूर्तिकाम व्यवसायाने यंदा मोठी गती घेतली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अहोरात्र सुरू असलेल्या कारखान्यांमधून तयार झालेल्या रेखीव आणि आकर्षक गणेशमूर्ती आता देश-विदेशातील बाजारपेठेत रवाना झाल्या आहेत. यंदा पेणमधील गणेशमूर्ती निर्मिती आणि विक्रीची एकूण उलाढाल १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता मूर्तिकार आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

यंदा प्रशासनाचे नियम, पर्यावरणविषयक जनजागृती आणि गणेशभक्तांचा बदलता कल यामुळे शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींच्या मागणीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. दुसरीकडे पीओपीच्या मूर्तींच्या माग व उत्पादनात सुमारे १५ ते २० टक्क्यांची घट झाल्याचे दिसून येत आहे.

पेण शहरातील कुंभारवाडा आणि जोशी आळीसह हमरापूर, जोहे, दादर, गडब या ग्रामीण भागात ३,००० हून अधिक मूर्ती कारखान्यांमध्ये यंदा शाडूच्या मूर्तींचे प्रमाण अधिक ठेवण्यात आले आहे.

सुबक कलाकुसर, परदेशात डंका

पेणच्या मूर्तींची रेखीव आखणी, मोहक डोळे आणि कापडी वस्त्रालंकारांनी केलेली सजावटयामुळे या मूर्तींना मुंबई, ठाणे,पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यांतून प्रचंड मागणी आहे.

केवळ भारतातच नव्हे,तर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दुबई आणि मॉरिशस यांसारख्या देशांमध्ये स्थायिक झालेल्या भाविकांकडूनही पेणच्या गणेशमूर्तींना पसंती दिली जात आहे.

लाखो हातांना रोजगार

पेणचा गणेशमूर्ती उद्योग हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा मानला जातो. या व्यवसायाच्या माध्यमातून मूर्तिकार, रंगकाम करणारे कलाकार, माती आणि साहित्याचे व्यापारी, तसेच वाहतूकदार आणि पॅकिंग कामगार अशा ५० हजारांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतो.

कच्च्या मालाच्या महागाईचे सावटशाडूची माती, नैसर्गिक रंग, पारंपरिक सजावटीचे साहित्य आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने यंदा मूर्तींच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही पेणच्या मूर्तींची असलेली पारंपरिक गुणवत्ता आणि आकर्षक कलाकुसर यामुळे भाविकांचा प्रतिसाद कायम असल्याचे स्थानिक मूर्तिकारांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT