Panvel Zilla Parishad election Pudhari
रायगड

Panvel Zilla Parishad election: पनवेलमध्ये भाजपचा सुनामी विजय; जि.प.च्या सर्व 8 जागा आणि पं.स.च्या 16 पैकी 15 जागांवर भाजपचे वर्चस्व

शेकापचा इतिहासात पहिल्यांदाच सुपडा साफ; पंचायत समितीत उबाठाला केवळ एकच जागा

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : विक्रम बाबर

रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 चा निकाल जाहीर होताच पनवेल तालुक्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले असून भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवत स्थानिक सत्तेवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्हा परिषदेमधील सर्वच्या सर्व 8 जागांवर भाजप उमेदवारांनी विजय संपादन करत तालुक्यातील सत्ता पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतली आहे. त्याचबरोबर पंचायत समितीच्या 16 पैकी तब्बल 15 जागांवर विजय मिळवत भाजपने स्थानिक राजकारणातील आपली ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. पंचायत समितीतील उर्वरित एका जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैदेही विक्रांत पाटील यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजप उमेदवार शीतल अनंता माळी यांचा केवळ 654 मतांनी पराभव करत निसटता विजय मिळवला आहे.

मतमोजणी प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच भाजप उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. प्रत्येक फेरीत भाजप उमेदवारांची आघाडी वाढत गेल्याने मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अंतिम निकाल जाहीर होताच ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. पनवेल तालुक्यात भाजपने मिळवलेल्या या दणदणीत विजयामुळे आगामी स्थानिक राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

या निवडणुकीला पनवेल तालुक्यात विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. ग्रामीण भागातील विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य सुविधा तसेच विविध पायाभूत प्रकल्प यावरून प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला होता. दुसरीकडे, पंचायत समितीतील एका गणामध्ये झालेली लढत विशेष लक्षवेधी ठरली. या गणात उबाठा गटाच्या उमेदवाराने अत्यंत चुरशीच्या संघर्षानंतर भाजप उमेदवाराचा केवळ 654 मतांनी पराभव करत विजय मिळवला. ही लढत अखेरच्या फेरीपर्यंत रंगली होती. या विजयामुळे विरोधी पक्षाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी एकूण निकालावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे.

या निवडणुकीत सर्वाधिक फटका शेतकरी कामगार पक्षाला बसला असून पक्षाचा अक्षरशः दारुण पराभव झाला आहे. पनवेल तालुक्यात शेकापला एकही जागा जिंकता आली नसल्याने पक्षाचा सुपडा साफ झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. पारंपरिक प्रभाव असलेल्या काही भागातही शेकाप उमेदवार पिछाडीवर राहिल्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकरी कामगार पक्षाने जिल्हा परिषदेच्या एकूण 8 जागे पैकी 6 जागांवर स्वतःचे उमेदवार उभे केले होते, तर एक जागा मनसे आणि एक जागा शिवसेना उबटा गटाला दिली होती, त्या 6 जागेवरील सर्वच उमेदवाराचा पराभव झाल्याने.

शेतकरी कामगार पक्षाचा पनवेल तालुक्यातील इतिहास मोडीत निघाला आहे, पहिल्यादाच पनवेल तालुक्यातून एकही जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेवर दिसून येणार नाही त्या सोबत पनवेल पंचायत समितीमध्ये देखील अशेच निराशा जनक चित्र पहायला मिळाले आहे, पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाचे एक हाती सत्ता आत्ता पर्यंत दिसून येत होती. ग्रामीण भाग शेकापचा बालेकिल्ला मानलं जात होता. पंचायत समितीसाठी शेतकरी कामगार पक्षाने 16 जागांपैकी 9 जागेवर उमेदवार दिले होते मात्र या पैकी एकही उमेदवार निवडून आला नाही तर भाजपच्या 9 उमेदवारांनी त्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे भाजपच यंदाच्या निवडणुकीत वरचढ दिसून आली आहे.

पनवेल तालुक्यातील या निकालामुळे स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने मिळवलेल्या या यशामुळे पक्षाच्या नेतृत्वाला मोठे बळ मिळाले असून तालुक्यातील सत्तेची सूत्रे अधिक मजबूतपणे भाजपच्या हाती गेली आहेत. आगामी काळात स्थानिक विकासकामे आणि राजकीय निर्णय प्रक्रियेत भाजपचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या निवडणुकीच्या निकालामुळे पनवेल तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडून आले आहेत. भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही स्तरांवर निर्विवाद सत्ता मिळवत आपली संघटनात्मक ताकद आणि मतदारांमधील विश्वास अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT