Panvel youth rescued from 60 feet depth 
रायगड

Panvel youth rescued from 60 feet depth|६० फूट खोल पडलेल्या युवकाची सुखरूप सुटका

Panvel youth rescued from 60 feet depth | ६० फूट खोल पडलेल्या युवकाची सुखरूप सुटका

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : पुढारी वृत्तसेवा

कर्नाळा स्पोर्ट्स जवळील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या नवीन उड्डाणपुलावरून अंदाजे ५०-६० फूट खाली पडलेल्या १६ वर्षीय युवकाची पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने अत्यंत शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप सुटका केली. १० नोव्हेंबर रोजी रात्री १०.२५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रतिकूल परिस्थितीत राबविलेल्या धाडसी बचावकार्यामुळे युवकाला वेळीच बाहेर काढण्यात यश आले.

याबाबत अग्निशमक सागर जाधव यांनी पनवेल अग्निशमन केंद्राला दूरध्वनीद्वारे माहिती दिली. कर्नाळा स्पोर्ट्सजवळील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या नवीन उड्डाणपुलावर फटाके फोडण्यास गेलेला एक युवक खाली पडल्याचे समजताच अग्निशमन दलाची दोन वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाली.ہ

घटनास्थळी पोहोचल्यानंतर युवक उड्डाणपुलावरून सुमारे १०० फूट खाली पडल्याचे निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य आणि बचावकार्याची जोखीम लक्षात घेऊन अतिरिक्त साहित्य व मनुष्यबळ मागविण्यात आले. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी नियोजनबद्ध पद्धतीने बचावकार्य सुरू केले. उड्डाणपुलाखालील ठिकाणी पोहोचण्यासाठी दोन जवानांनी सुमारे दीड किलोमीटर अंतर पायी पार केले. त्यानंतर तीन दोरखंड, बॉडी हार्नेस, हेल्मेट आणि तीन टॉर्चच्या साहाय्याने युवकाला दोरखंडाच्या मदतीने सुरक्षितपणे वर काढण्यात आले.

बचाव करण्यात आलेल्या युवकाचे नाव शिवांश दामले असून तो ओल्ड पनवेल येथील लाईन आळी परिसरातील रहिवासी आहे. त्याचे वय अंदाजे १६ वर्षे आहे. सुटकेनंतर त्याला पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळाची तपासणी करून परिसरात कोणताही धोका नसल्याची खात्री केल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान वाहनांसह केंद्रात परतले.

या धाडसी बचावकार्यात उपअग्निशमन केंद्र अधिकारी शुभम राठोड, प्रमुख अग्निशमन विमोचक शिवा आडे, यंत्रचालक आकाश नलवडे व शिवलाल अलदर तसेच अग्निशामक शुभांगी घुले, शंकर वाकडे, विक्रांत सपकाळ, सुनील मोरे, प्रीतम पाटील, निकितेश डुकरे आणि प्रणय म्हसकर यांनी सहभाग घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेली तत्परता, धाडस आणि समन्वय यामुळे युवकाची सुखरूप सुटका करणे शक्य झाले. आयुक्त मंगेश चितळे यांनी अग्निशमन विभागाच्या या धाडसी मोहीमेत सहभागी सर्व अधिकारी व अग्निशामकांचे कौतुक करून अभिनंदन केले.

कर्नाळा स्पोर्ट्स जवळील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या नवीन उड्डाणपुलावर काही ठिकाणी काम सुरू आहे, त्यामुळे याठिकाणी दुर्घटना घडवण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी गर्दी करू नये, तसेच या ठिकाणी फटाके फोडू नये, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

- प्रवीण बोडखे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पनवेल महानगरपालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT