पनवेल ग्रामीण भागात 21 तास वीज पुरवठा खंडित pudhari photo
रायगड

Panvel rural power outage : पनवेल ग्रामीण भागात 21 तास वीज पुरवठा खंडित

40 गावात अंधार, जनजीवन विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

खारघर : तब्बल 21 तासानंतर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील जवळपास 40 हुन अधिक गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. मध्यरात्री वीज गायब झाल्याने अनेकांना भयंकर त्रास सहन करावा लागला. विद्युत अधिकार्‍यांना भ्रमणध्वनीवर फोन केला असता त्यांचे फोन फॉरवर्ड केले असल्याचे वीज ग्राहकांनी सांगितले.

सात ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बारा वाजता खंडित झालेला विद्युत पुरवठा 8 ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या दरम्यान सुरळीत करण्यात आला. तब्बल 21 तास वीज नसल्याने अनेकांचे पाण्याविना हाल झाले. पाणी नसल्याने काहींना तर अंघोळ देखील करता आली नाही. तर कित्येकांना पाण्याचे जार विकत घ्यावे लागले. मध्यरात्री वीज गायब झाल्याने अनेकांची झोपमोड झाली. त्यातच मच्छरानी देखील नागरिकांना हैराण केले.

वीज नसल्याने अनेकांना लहान मुलांसोबत जागरण करावे लागले. काही वेळानंतर विज येईल या भाबड्या आशेत नागरिक होते. मात्र हजारो वीज ग्राहकांनी तब्बल 21 तासानंतर विज आल्याने सुटकेचा निःश्वास सोडला. ऑक्टोबर हिट असल्याने रात्री आणि दिवसा प्रचंड उष्मा जाणवत होता. त्यातच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील या विजेचा फटका बसला. फॅन नसल्याने वर्गात उष्णता जाणवत होती.

दुग्धजन्य पदार्थ, आईस्क्रीम हे खराब झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकाना बसला आहे. मात्र तब्बल 21 तासानंतर विद्युत पुरवठा सूरळीत झाल्याने अनेक जण नाराज झाले. वीज कधी येईल यासाठी वितरणच्या अधिकार्‍यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईल फोन फॉरवर्ड केले होते. त्यामुळे कोणाशी संपर्क साधायचा हेच समजत नव्हते.

आकुर्ली उपकेंद्रातील 22 केवी एचटी केबलमध्ये फॉल्ट झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. लोड डायव्हर्ट करून काही ठिकाणी वीजपुरवठा रात्रीच सुरू करण्यात आला होता. 2.5 किमी लांब केबल असल्यामुळे फॉल्ट आइडेंटिफाय केल्यानंतर केबल जोडण्याचे काम सुरु होते.
ममता पांडे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT