Panvel RTO Pudhari
रायगड

Panvel RTO: गणेशोत्सवकाळातील अतिरिक्त प्रवास भाडे आकारणीला 'चाप'; वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

; पनवेल आरटीओचा इशारा; कोकणवासियांचा प्रवास होणार सुखकर

पुढारी वृत्तसेवा

खारघर: आठ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे हजारो कोकणवासिय गावाकडे निघाले असून वाहतूक सेवांकडे बुकींग सुरु झाले आहे. या हंगामाच्या काळात वाहतूक व्यावसायिकांकडून अतिरिक्त भाडे आकारणी, अपुऱ्या सुविधा तर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघनही केले जाते.

यातून कोकणवासियांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे कोकणवासियांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी पनवेल आरटीओ विभागाचेे गणेशोत्सवातील वाहतूक सेवांवर लक्ष राहणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह विविध भागांतून कोकणात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि विनाअडथळा व्हावा, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्यामार्फत आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय, लूटमार, अवाजवी भाडे आकारणी तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक व मालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्यामार्फत देण्यात आला आहे.

गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वे स्थानक, बसस्थानके तसेच प्रमुख वाहतूक केंद्रांवर दाखल होणार असल्याने रिक्षा व प्रवासी बस वाहतूकदारांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

प्रवाशांकडून शासनाने अथवा परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अवाजवी भाडे आकारू नये, तसेच प्रवाशांशी उद्धटपणे वर्तन करू नये. रिक्षाची प्रवासी क्षमता लक्षात घेऊनच प्रवाशांची वाहतूक करावी. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

खासगी तसेच प्रवासी बस चालक आणि मालकांनीही गणेशोत्सवाच्या काळात विशेष दक्षता घ्यावी. बसमधील आपत्कालीन खिडकी किंवा दरवाजा, अग्निशामक यंत्रणा आणि प्रथमोपचार पेटी सुस्थितीत व वापरण्यायोग्य असणे आवश्यक आहे.

चालकाने मद्यपान करून किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवू नये. अशा प्रकारचे नियमभंग आढळल्यास संबंधित चालकासह बस मालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल. गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रवासी बसच्या फेऱ्या आणि सुटण्याच्या वेळांचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT