पनवेल: रोडपाली येथील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदत संपलेल्या तसेच खराब झालेल्या वस्तूंची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक रामदास शेवाळे यांनी केला आहे. ग्राहकांकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे शेवाळे यांनी शिवसैनिकांसह संबंधित मार्टमध्ये धडक दिल्यानंतर पोलिसांना तसेच अन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली.
कळंबोली येथील प्रभारी अधिकारी अंकिता गावडे यांच्यासह पथकाने संबंधित ठिकाणी पाहणी केली. मार्टमधील विविध खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची तपासणी करण्यात आली. पाहणीत विविध वस्तू आढळून आल्याची माहिती देण्यात आली असून, संबंधित माल जप्त करून पंचनामा करण्यात आला.
तपासणीदरम्यान आढळलेल्या वस्तूंबाबत मार्ट व्यवस्थापनाकडे विचारणा करण्यात आली. मुदत संपलेल्या अथवा खराब झालेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत कशा पोहोचत होत्या, त्यांची तपासणी कोणत्या पद्धतीने केली जाते, साठवणूक आणि गुणवत्ता नियंत्रणाची व्यवस्था काय आहे, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या प्रकरणातील नेमकी जबाबदारी निश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील तपासणी आणि नमुन्यांची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. संबंधित वस्तूंच्या तपासणी अहवालानंतरच नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही, याबाबत अधिकृत निष्कर्ष स्पष्ट होणार आहे.