पनवेल : पनवेलकडे जाण्यासाठी एकाच उड्डाणपुलावर अवलंबून राहावे लागत असल्याने कोणताही अनुचित प्रसंग घडू नये, यासाठी अखेर रेल्वे प्रशासनाने स्थानकातील भुयारी मार्ग पुन्हा सुरू केला आहे.
पनवेल रेल्वे स्थानकात सकाळी व संध्याकाळी चाकरमान्यांसह लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. पनवेलकडे जाण्यासाठी एकाच उड्डाणपुलावर अवलंबून राहावे लागत असल्याने कोणताही अनुचित प्रसंग घडू नये, यासाठी अखेर रेल्वे प्रशासनाने स्थानकातील भुयारी मार्ग पुन्हा सुरू केला आहे. या निर्णयामुळे नवीन पनवेलकडे जाणारा पर्यायी मार्ग खुला झाला असून प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मात्र प्रत्यक्षात भुयारी मार्गातून मोठ्या प्रमाणावर सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जड बॅगा, ट्रॉली आणि अपुऱ्या सुविधांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. इतकी वर्षे हा त्रास सहन करायचा का, असा संतप्त सवाल आता प्रवासी वर्ग करत आहे. स्थानकात लिफ्ट, रॅम्प किंवा स्वतंत्र व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व अपंग प्रवाशांचे हाल होत आहेत.