Panvel Railway Crowd Pudhari
रायगड

Panvel Railway Crowd: पनवेल रेल्वेस्थानकात चाकरमान्यांची गर्दी; शनिवारी सकाळपासूनच गावी जाण्यासाठी प्रवाशांची लगबग

आरक्षणाच्या गाड्यांची तिकिटे फुल्ल झाली असतानाही बाप्पाच्या भेटीची आस लागलेल्या चाकरमान्यांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही.

पुढारी वृत्तसेवा

खांदा कॉलनी: लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघा एक दिवस उरला असताना कोकणातील चाकरमान्यांना बाप्पाच्या भेटीची ओढ लागली आहे. गावी जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळपासूनच प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

आरक्षणाच्या गाड्यांची तिकिटे फुल्ल झाली असतानाही बाप्पाच्या भेटीची आस लागलेल्या चाकरमान्यांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. ‘मिळेल ती रेल्वे पकडायची आणि गावी पोहोचायचे’, असा निर्धार अनेक प्रवाशांनी केला आहे.

कोकणाकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या असल्या तरी स्थानकावरील गर्दी कमी होताना दिसत नाही. हातात बॅगा, सोबत लहान मुले आणि कुटुंबीयांना घेऊन चाकरमानी रेल्वेची प्रतीक्षा करताना दिसत आहेत. काही प्रवासी आरक्षित तिकिटाच्या प्रतीक्षेत, तर काही मिळेल त्या गाडीने गावी जाण्याच्या तयारीत आहेत.

गणेशोत्सवासाठी वर्षभर वाट पाहणाऱ्या चाकरमान्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत आहे.‘बाप्पा, मी येतोय... तुझ्या स्वागतासाठी!’ अशी भावना प्रत्येकाच्या मनात असल्याचे भक्तिपूर्ण वातावरण पनवेल रेल्वे स्थानकात पाहायला मिळत आहे.

गावी पोहोचल्यानंतर घरातील गणरायाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी विविध साहित्यही सोबत घेतले आहे. कोकणातील घराघरांत गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू असल्याने चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची लगबग वाढली आहे.

रेल्वे स्थानकातील फलाटांवर प्रवाशांची गर्दी, सामानाच्या बॅगा आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष असे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून हजारो चाकरमानी कोकणाच्या दिशेने रवाना होत आहेत.

आरक्षण मिळाले नाही, गर्दी असली तरी बाप्पाला भेटायचेच, या भावनेने प्रवासी मिळेल त्या गाडीने गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था असली तरी प्रवाशांची स्थानकावर मोठी गर्दी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT