खांदा कॉलनी: पनवेल रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रवाशांच्या चोरीच्या घटनांवर मोठी कारवाई करत एका सराईत चोराला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल २६ लाख ३१ हजार ६८ किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
१७ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजता मंगळ लक्षद्वीप एक्स्प्रेस पनवेल रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर आल्यानंतर एसी डब्यातून संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीवर रेल्वे पोलिसांची नजर गेली.
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक एस. एम. पाटील, पोलीस हवालदार इंगवले व कदम यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आढळून आले. समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याला पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी करण्यात आली.
जप्त मुद्देमालाबाबत देशभरातील रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली असता गोव्यातील कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याशी त्याचा संबंध असल्याचे उघड झाले. संबंधित गुन्ह्यातील फिर्यादी केरळला प्रवास करत असताना त्यांच्या पत्नीची दागिने व आयफोन असलेली हँडबॅग चोरीला गेली होती.
आरोपीचा ताबा पुढील कारवाईसाठी कोकण रेल्वे पोलिसांकडे देण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपआयुक्त प्रज्ञा झेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सोपान काकडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अभिमन्यू तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल रेल्वे पोलीस पथकाने केली.