Palghar Heavy Rain: सूर्या नदीला पूर, मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; ५० गावांचा वीजपुरवठा खंडित

चिल्हार मार्गावरील वाहतूक ठप्प
Palghar Heavy Rain
Palghar Heavy RainPudhari
Published on
Updated on

बोईसर: पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला आलेल्या महापुराने ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नदीच्या दोन्ही काठावरील विद्युत पुरवठा करणारे अनेक वीज खांब पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने चाळीस ते पन्नास गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने विद्युत पुरवठा पूर्ववत होण्यासाठी किती दिवस लागतील, याबाबत महावितरणकडूनही स्पष्ट माहिती देणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पुढील काही दिवस अंधारातच काढावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्याने मोबाईल नेटवर्क व्यवस्थाही पूर्णपणे कोलमडली आहे. परिणामी ऑनलाइन व्यवहार, बँकिंग सेवा तसेच इंटरनेटवर अवलंबून असलेली अनेक कामे ठप्प झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, बोईसर-चिल्हार मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने आणि रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने दिवसभर वाहतूक ठप्प होती. अनेक वाहने रस्त्यावर अडकून पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

Palghar Heavy Rain
Mumbra Metro Line 12: मेट्रो-१२ मुळे मुंब्रावासीयांचा प्रवास होणार सुखकर

अशा कठीण परिस्थितीत फुलाचापाडा येथील ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेत सुमारे ३५० अडकलेल्या नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले. ग्रामस्थांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या पूरस्थितीमुळे पाटबंधारे विभागाविरोधात नदीकाठच्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले, मात्र याबाबत नदीकाठच्या गावांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पूर्वकल्पना मिळाली असती तर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता आल्या असत्या, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

सूर्या नदीच्या पुरामुळे अनेक गावे व वाड्या-पाडे पाण्याखाली गेले असून घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, पूरग्रस्त भागात महसूल विभागाकडून अद्याप सर्वेक्षण किंवा पंचनाम्याचे काम सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

Palghar Heavy Rain
Jantar Mantar Protest: आंदोलनाने रिक्षा, टॅक्सी भाडे, हॉटेल्सचे दर वधारले; आंदोलकांची परवड

पूरग्रस्तांनी तातडीने वीजपुरवठा सुरळीत करणे, नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून मदत जाहीर करणे, तसेच धरणातून पाणी सोडण्यापूर्वी प्रभावी इशारा प्रणाली कार्यान्वित करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news