Panvel Public Toilet Misuse Pudhari
रायगड

Panvel Public Toilet Misuse: पनवेल पालिकेच्या सार्वजनिक शौचालयातच थाटला संसार! बेड, सोफा, वॉशिंग मशीनसह स्वतंत्र किचनचा कारभार

उबाठा गटाचे युवा नेते सुनील गोवारी यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचा वापर चक्क राहण्यासाठी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार कामोठे सेक्टर १५ येथे समोर आला आहे. शौचालयाच्या जागेत राहण्यासाठी बेड, बसण्यासाठी आलिशान सोफा, कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन, तसेच जेवण बनविण्यासाठी स्वतंत्र किचन उभारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

उबाठा गटाचे युवा नेते सुनील गोवारी यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यांनी संबंधित शौचालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून या प्रकाराकडे पनवेल महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सार्वजनिक वापरासाठी असलेल्या शौचालयात संसार थाटला जात असताना संबंधित अधिकारी व कर्मचारी काय करत होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

या शौचालयातील किचनमध्ये स्वयंपाकासाठी लागणारी भांडी आणि अन्य साहित्य ठेवण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. तसेच राहण्यासाठी बेड आणि बसण्यासाठी सोफा, कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन अशा सुविधा उभारण्यात आल्याने सार्वजनिक शौचालयाचा नेमका वापर कोण आणि कोणत्या कारणासाठी करत आहे, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सार्वजनिक शौचालयांची देखभाल, स्वच्छता आणि योग्य वापराची जबाबदारी संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटदाराची असते. मात्र, शौचालयाच्या जागेचाच अशा प्रकारे वापर होत असल्याने देखभालीची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून शौचालयाचा वैयक्तिक वापर करणाऱ्यांवर तसेच त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी गोवारी यांनी केली आहे.

सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या सुविधांचा वापर नागरिकांच्या सोयीसाठी होणे अपेक्षित असताना त्याचा गैरवापर होत असल्यास प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. या प्रकाराबाबत महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता कामोठेकरांचे लक्ष लागले आहे.

कामोठे वसाहती मधील सेक्टर १५ मधील सार्वजनिक शौचालयात थाटलेल्या संसाराबाबत आम्ही या घटने कडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी, केली आहे तर पालिकेचे अधिकारी हफ्ते घेतात. २० तारखेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर मी स्वतः इथे उपोषणाला बसणार आहे. सार्वजनिक शौचालयाचा वापर निवासी वापरासाठी होत असताना महापालिका प्रशासनाची उदासिनता संतापजनक आहे. या घटनांना आळा हा बसलाच पाहिजे.
- अरविंद म्हात्रे, महापालिका विरोधी पक्ष नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT