Police Raid Pudhari
रायगड

Panvel Pregabalin Capsules: प्रिस्क्रिप्शनशिवाय ‘प्रेगाबालिन’ची विक्री; आसुडगावमधील मेडिकलवर छापा, २,२२० कॅप्सूल जप्त

आसुडगावच्या महादेव मेडिकल स्टोअर्सवर छापा; २ हजार २२० प्रेगाबालिन कॅप्सूल जप्त, तिघांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रेगाबालिन कॅप्सूलची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअरवर कारवाई करण्यात आली. कळंबोली विभागातील आसुडगाव येथील महादेव मेडिकल स्टोअर्स येथे करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण २ हजार २२० प्रेगाबालिन कॅप्सूल जप्त करण्यात आल्या.

याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध ड्रग्स ॲण्ड कॉस्मेटिक्स ॲक्ट तसेच बीएनएसअंतर्गत खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसुडगाव परिसरातील महादेव मेडिकल स्टोअर्स येथे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रेगाबालिन कॅप्सूल तसेच इतर औषधांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाने एफडीए, कळंबोली विभागातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने संबंधित मेडिकल स्टोअरवर छापा टाकून तपासणी केली.

दरम्यान, या मेडिकल स्टोअरला प्रेगाबालिन कॅप्सूलचा पुरवठा करणाऱ्या विशाल जाधव याच्याकडे औषधांच्या पुरवठ्याबाबत आवश्यक वैध कागदपत्रे नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील २ हजार ०७० आणि मेडिकलमधील १५० अशा एकूण २ हजार २२० प्रेगाबालिन कॅप्सूल जप्त करण्यात आल्या.

चढ्या दराने कॅप्सूल विकल्याचे उघड

तपासणीदरम्यान मेडिकलमध्ये प्रेगाबालिन कॅप्सूल आयपीची प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री होत असल्याचे आढळून आले. नशेसाठी या औषधांचा वापर करणाऱ्या व्यक्तींना चढ्या दराने कॅप्सूल विकल्या जात असल्याचेही तपासात समोर आले.

कारवाईदरम्यान मेडिकलमधून १५ पाकिटांमधील १५० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे या औषधांच्या खरेदी-विक्रीबाबत मेडिकलच्या रजिस्टरमध्ये आवश्यक नोंदी आढळून आल्या नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT