Woman Attacked in Panvel
पनवेल : कर्जाची परतफेड करण्यासाठी प्रवासी महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी करणाऱ्या ऑटो रिक्षाचालकाला अवघ्या ४८ तासांत अटक करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी संगिता सोमनाथ भोईर (रा. करंजाडे) या रिक्षाने घरी जात असताना करंजाडे सेक्टर आर/०४ येथील सत्य ट्रायंडंट बिल्डिंगजवळील सर्व्हिस रोडवर चालकाने रिक्षा बंद पडल्याचे सांगून ती थांबवली. त्यानंतर अचानक धारदार चाकू काढून आरोपीने त्यांच्या गळ्यावर, छातीवर आणि पायावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या महिलेकडून त्याने सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेत पळ काढला. जखमी अवस्थेत महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके स्थापन करण्यात आली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांची चौकशी केली. एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने रिक्षाच्या क्रमांकातील शेवटचे चार अंक लक्षात ठेवल्यामुळे तपासाला दिशा मिळाली. या माहितीच्या आधारे संबंधित क्रमांकाच्या सर्व रिक्षांचा शोध घेण्यात आला.
संशयाच्या आधारे (MH 04 LX 4619) या रिक्षाचा चालक अक्षय एकनाथ बागडे (वय २७, रा. करंजाडे) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कर्ज फेडण्यासाठी पैशांची गरज असल्याने आपण हा गुन्हा केल्याची माहिती त्याने प्राथमिक चौकशीत दिली.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र व इतर साहित्य जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या कारवाईत सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल, पोलीस निरीक्षक (प्रशासन) अभिजीत अभंग तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
दरम्यान, नागरिकांनी विशेषतः महिलांनी एकांत ठिकाणी किंवा रात्री प्रवास करताना सतर्क राहावे, वाहनाचा क्रमांक नोंदवून ठेवावा आणि आपत्कालीन प्रसंगी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.