Panvel Municipal Corporation Pudhari
रायगड

Panvel Municipal Corporation: पनवेल महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी महायुतीचे अर्ज दाखल; ठाकरे शिवसेनेत अंतर्गत मतभेद उफाळले

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीकडून पाच उमेदवार रिंगणात; उबाठा गटात शिरीष घरत समर्थकांचा उमेदवारीवर विरोध

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : विक्रम बाबर

पनवेल महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीच्या वतीने आज अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीकडून भाजपचे युवानेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, डॉ. अरुणकुमार भगत, दिनेश खानावकर तसेच शिवसेनेचे ॲड. प्रथमेश सोमण यांनी आपले अर्ज महापालिकेचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब कामठे यांच्याकडे दाखल केले.

अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक ऍड. प्रकाश बिनेदार, शिवसेना नेते रमेश गुडेकर, भाजपचे शहर अध्यक्ष व नगरसेवक सुमित झुंझारराव, युवा नेते संजय जैन आदि उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीमध्ये पुन्हा एकदा भाजप महायुतीने वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीत भाजपने 55, शिवसेनेने 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवत एकूण 59 जागांसह पनवेल महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजप महायुतीची भक्कम सत्ता प्रस्थापित केली. त्या अनुषंगाने महापौरपदी नितीन पाटील तर उपमहापौरपदी प्रमिला पाटील विराजमान झाले. 59 जागांवर विजय मिळाल्यामुळे सातपैकी पाच स्वीकृत नगरसेवक पदे महायुतीच्या वाट्याला आली आहेत. निर्वाचित 59 आणि स्वीकृत पाच अशी एकूण 64 संख्याबळ महायुतीची होणार आहे.

उबठा गटातील वाद चव्हाट्यावर

उमेदवारीबाबत ठाकरे शिवसेनेतील सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांना विश्वासात घेण्यात आले नाही, अशी तक्रार घरत समर्थकांकडून करण्यात येत आहे. निर्णयप्रक्रियेत सल्लामसलत न झाल्याने गटातील असंतोष उफाळून आला असून हा विषय आता उघडपणे चर्चिला जात आहे.महापालिका निवडणुकीत उबाठा गटाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सात नगरसेवक निवडून आणले होते. निवडणुकीनंतर उबाठा गटातील काही नेत्यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने मतभेद असल्याची चर्चा होती. मात्र स्वीकृत नगरसेवक पदाच्या निमित्ताने हे मतभेद स्पष्टपणे समोर आले आहेत. विशेष म्हणजे स्वीकृत नगरसेवक पदाचा अर्ज भरण्यासाठी उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची गैरहजेरीच पक्षातील गटबाजी सांगून जात होती. नितीन गावंडे यांचा उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील, नवनिर्वाचित नगरसेविका लीना गरड व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उबाठा गटातून निवडून आलेले अन्य नगरसेवक गैरहजर असल्याचे दिसून आले.

ठाकरे शिवसेनेत अंतर्गत मतभेद उफाळले,

जिल्हा प्रमुख शिरीष घरत गट नाराज

पनवेल महानगपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून ठाकरे शिवसेनेत अंतर्गत मतभेद उफाळून आल्याचे चित्र आज पालिकेत पाहायला मिळाले, उबाठा गटातून स्वीकृत नगरसेवक पदासाठी नितीन गावंड यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर, त्याच्याच पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या गटातील तीन नगरसेवकांनी या उमेदवारी अर्जाला विरोध दाखवत उमेदवारी अर्जाची प्रकिया थांबवण्याची मागणी नगरसेविका रितिक्ष गोवारी, मेघना घाडगे आणि प्रिया गोवारी यांनी केली आहे. या नाराजी आणि विरोधामुळे उबाठा गटातील स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT