घरफोडी करणाऱ्या ६५ वर्षीय सराईत चोरट्याला कळंबोली पोलिसांनी अटक केली.  Pudhari
रायगड

Panvel Theft Case | शाळा-कॉलेज लुटण्याचा वेगळाच फंडा; ६५ वर्षीय सराईत चोरटा अटकेत

कळंबोली पोलिसांची कारवाई; १ लाख ७६ हजार ७७० रुपयांची रोकड आणि घरफोडीचे साहित्य जप्त

पुढारी वृत्तसेवा

Panvel Theft Case Arrest

पनवेल : शाळा आणि महाविद्यालयांनाच लक्ष्य करून चोरी व घरफोडी करणाऱ्या ६५ वर्षीय सराईत चोरट्याला कळंबोली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली. शेखर सेरप्पा पुजारी (वय ६५, रा. खार, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेली १ लाख ७६ हजार ७७० रुपयांची रोकड, तसेच घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

कळंबोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर १४ येथील एमईएस पब्लिक स्कूलमध्ये ११ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरी झाली होती. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. चोरट्याने शाळेच्या कार्यालयाच्या खिडकीचे ग्रील कापून आत प्रवेश केला आणि कार्यालयात ठेवलेली १ लाख ७६ हजार ७७० रुपयांची रोकड लंपास केली.

घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, हवालदार सचिन पवार, हवालदार आबु जाधव, निलेश सोळुंके आणि शरद मराठे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढला. त्यानंतर खार, मुंबई येथून शेखर पुजारी याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीची संपूर्ण रोकड आणि घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.

शाळा-कॉलेजमध्येच चोरीची ‘मोडस ऑपरेंडी’

पोलिसांच्या तपासात आरोपीची चोरी करण्याची पद्धत वेगळी असल्याचे समोर आले आहे. सर्वसामान्य घरांना लक्ष्य करण्याऐवजी तो शाळा आणि महाविद्यालयांमध्येच चोरी व घरफोडी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई परिसरातील शैक्षणिक संस्थांमध्ये यापूर्वी झालेल्या चोरीच्या घटनांशी त्याचा संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

अनेक जिल्ह्यांत गुन्ह्यांची नोंद

शेखर पुजारी हा शाळा आणि महाविद्यालयांमधील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांसाठी पोलिसांच्या रेकॉर्डवर असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध कोल्हापूर, सातारा, इचलकरंजी, कल्याण, पुणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, नवी मुंबई परिसरातील शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये चोरी अथवा घरफोडीच्या घटना घडल्या असल्यास संबंधित शैक्षणिक संस्थांनी कळंबोली पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT