खांदा कॉलनी : दिवाळी म्हटली की आनंद, उत्साह आणि खरेदीची लगबग आलीच. दिवाळीच्या निमित्ताने पनवेल शहरातील उरण नाका तसेच जुन्या भाजी मार्केट परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. विविध भागांतून व्यवसायासाठी आलेले फेरीवाले, फुलविक्रेते, भाजीविक्रेते आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे बाजारपेठा अक्षरशः फुलून गेल्या होत्या. मात्र, या गर्दीचा परिणाम बाजारपेठेतील स्वच्छतेवरही झाला.
फुलांचे अवशेष, भाजीपाल्याचा कचरा, कागदी खोकी, प्लास्टिक आणि इतर वस्तूंचा कचरा मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर साचला होता. यंदा दिवाळीतील पहिली अंघोळ आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने खरेदीसाठी नागरिकांची अधिकच गर्दी झाली होती. त्यामुळे बाजारपेठांमध्ये कचऱ्याचे ढीग निर्माण झाले होते.
मात्र, नागरिकांची ही गर्दी ओसरताच पनवेल महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. आरोग्य स्वच्छता निरीक्षकअरुण कांबळे , स्वच्छता निरीक्षक महेंद्र भोईर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १२ ते १५ स्वच्छता दूतांच्या पथकाने लक्ष्मीपूजनाच्या रात्रीच स्वच्छता मोहीम हाती घेतली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत बाजारपेठा, रस्ते आणि परिसरातील कचरा युद्धपातळीवर उचलण्यात आला.
या विशेष मोहिमेत तब्बल ४० टन कचरा गोळा करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा उचलण्यासाठी खास कचरा संकलन करणारी गाडीही मागविण्यात आली होती. विशेष म्हणजे, फटाक्यांमुळे रस्त्यांवर साचलेला कागद, फटाक्यांचे अवशेष आणि इतर कचराही स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रात्रीच साफ केला.
आपल्या घरात दिवाळीचा दिवा लावून आनंद साजरा करणारे नागरिक जेव्हा विश्रांती घेत होते, तेव्हा हे स्वच्छता दूत मात्र शहराच्या स्वच्छतेसाठी रस्त्यावर घाम गाळत होते. त्यांच्या या कामामुळेच पनवेल शहराचे सौंदर्य पुन्हा खुलले. आम्ही स्वच्छता दूत आहोत, शहर स्वच्छ ठेवणे हीच आमची दिवाळीअसा जणू संदेशच या कर्मचाऱ्यांनी आपल्या कृतीतून पनवेलकरांना दिला.
सण साजरा करताना स्वच्छतेची जबाबदारीही प्रत्येक नागरिकाने स्वीकारली, तरच 'माझे पनवेल, सुंदर पनवेल, स्वच्छ पनवेल' ही संकल्पना खऱ्या अर्थाने साकार होईल. लक्ष्मीपूजनाच्या रात्री पनवेलच्या बाजारपेठांमध्ये साचलेला कचरा उचलण्यासाठी रात्रभर राबणारे महानगरपालिकेचे स्वच्छता दूत. त्यांच्या मेहनतीमुळे दुसऱ्या दिवशी सकाळी शहराचे रस्ते पुन्हा स्वच्छ आणि सुंदर झाले.