पनवेल : शहरातील बेथ एल प्रार्थनालयात सशस्त्र अतिरेकी घुसल्याचा संदेश मिळताच सोमवारी सायंकाळी सुरक्षा यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली. कमांडो आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे चित्र निर्माण झाल्याने परिसरात काही काळ थराराचे वातावरण निर्माण झाले. मात्र, ही प्रत्यक्ष घटना नसून सुरक्षा यंत्रणांकडून घेण्यात आलेली मॉक ड्रिल असल्याचे स्पष्ट झाले.
प्रार्थनालयात अतिरेकी घुसल्याची माहिती मिळाल्याचा संदेश देत मॉक ड्रिलला सुरुवात करण्यात आली. माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या परिस्थितीत कोणत्या पद्धतीने कारवाई करायची, नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर कसे काढायचे आणि परिसर कसा ताब्यात घ्यायचा, याचे प्रात्यक्षिक या मॉक ड्रिलमध्ये घेण्यात आले.
दरम्यान, पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत पोलीस, कमांडो पथक आणि अग्निशमन दल यांच्यातील समन्वयाची चाचणी घेण्यात आली.
सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम
मॉक ड्रिलदरम्यान कमांडोंनी प्रार्थनालयाच्या परिसरात प्रवेश करून अतिरेक्यांचा सामना करण्याची कारवाई केली. अचानक निर्माण झालेल्या या थरारक दृश्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, ही सुरक्षा यंत्रणांची नियोजित रंगीत तालीम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.