रायगड : शरद निकुंभ
डिजिटल सुविधांचा गाजावाजा करणाऱ्या यंत्रणांमध्ये सामान्य ग्राहकांची मात्र कशी फरफट होते, याचा संतापजनक प्रत्यय पाली येथे पुन्हा एकदा आला. HP गॅस एजन्सीच्या वितरणादरम्यान मोबाईलवर ओटीपी प्राप्त न झाल्याने एका वृद्ध आजीला तब्बल तीन तास उन्हात ताटकळत राहावे लागले. अखेर सहनशीलतेचा अंत झाल्यानंतर त्यांनी गॅस सिलेंडरच्या वाहनाजवळच भर उन्हात झोपून आपला संताप व्यक्त केला.
पाली शहरात HP गॅस एजन्सीचे ग्राहकांसाठी स्वतंत्र कार्यालय अथवा वितरण केंद्र उपलब्ध नसल्याने ग्राहकांना सिलेंडर घेण्यासाठी गॅस वितरणाच्या वाहनाची वाट पाहत रस्त्यावर उभे राहावे लागते. विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना सकाळपासूनच सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागते. गॅस वाहन आले की नागरिकांची गर्दी होते आणि वितरणाच्या प्रक्रियेत अनेकदा तासन्तास वेळ जातो.
अशाच प्रकारे एका वृद्ध आजी सिलेंडर घेण्यासाठी रांगेत उभ्या होत्या. नंबर आल्यानंतर त्यांचे गॅस बुकिंग झाले नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यांनी तत्काळ शहरात राहणाऱ्या मुलाला फोन करून बुकिंग करण्यास सांगितले. मुलानेही तातडीने बुकिंग केले. बुकिंग यशस्वी झाल्याचा संदेश मोबाईलवर प्राप्त झाला; मात्र सिलेंडर वितरणासाठी आवश्यक असलेला चार अंकी ओटीपी काही केल्या येत नव्हता.
ओटीपी येण्याच्या प्रतीक्षेत आजीला थांबविण्यात आले. दरम्यान, रांगेतील इतर ग्राहकांना सिलेंडरचे वितरण सुरूच होते. मात्र, ओटीपी नसल्याने आजीला सिलेंडर मिळत नव्हता. पाहता पाहता तीन तास उलटले. उन्हाचा तडाखा आणि दीर्घकाळ उभे राहिल्याने त्यांना चक्कर येऊ लागली. वारंवार विनंती करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने अखेर त्यांनी गॅसच्या वाहनाजवळ जाऊन भर उन्हात झोपून आंदोलन केले.
आजीचा हा संतप्त पवित्रा पाहून कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. कोलाड येथील कार्यालयाशी संपर्क साधून वरिष्ठांना परिस्थितीची माहिती देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच मुलाच्या मोबाईलवर ओटीपी आला आणि अखेर आजीला सिलेंडर देण्यात आला. ओटीपी न मिळाल्यास तातडीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कार्यालय नाही, पर्यायी व्यवस्था नाही; ग्राहक वाऱ्यावर
पालीतील गॅस वितरणाचा हा प्रश्न केवळ एका दिवसापुरता किंवा एका वृद्ध महिलेपुरता मर्यादित नाही. यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या असून ग्राहकांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, वितरण व्यवस्थेत अद्याप ठोस सुधारणा झालेली दिसत नाही. ग्रामीण भागातील ग्राहकांना सिलेंडरसाठी ठरावीक ठिकाणी रस्त्यावर येऊन वाहनाची वाट पाहावी लागते. स्वतंत्र कार्यालय नसल्याने बुकिंग, वितरणासंबंधी तक्रारी किंवा तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी ग्राहकांना कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण होतो.
डिजिटल सुविधांचा उपयोग की ग्राहकांची गैरसोय
गॅस वितरणात ओटीपी प्रणालीमुळे पारदर्शकता आणि सुरक्षितता राखण्याचा उद्देश असला तरी तांत्रिक अडचणी आल्यास पर्यायी व्यवस्था असणे आवश्यक आहे. बुकिंग यशस्वी झाल्यानंतरही केवळ ओटीपी न आल्याने वृद्ध महिलेला तीन तास उन्हात थांबावे लागणे ही व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.