

भाईंदर : गायमुख ते फाउंटन हॉटेल या दरम्यानच्या महत्त्वपूर्ण रस्त्यावरील वाहतूक कोंडी, खड्डे व अपघातांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सध्या ३० मीटर रुंद असलेल्या रस्त्याचे ६० मीटर रुंदीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये बाधित होणाऱ्या जमिनींच्या भूसंपादनापोटी येणारा सुमारे १५० कोटी रुपयांचा खर्च एमएमआरडीए पूर्णपणे उचलणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गायमुख ते कासारवडवली दरम्यानच्या प्रस्तावित मेट्रो प्रकल्प १० सोबतच रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास येथील वाहतूक कोंडीसह अपघातांच्या समस्येतून लोकांची सुटका होणार असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पुढील आठवड्यापासून तातडीने सुरू करण्याच्या सूचना एमएमआरडीए आयुक्तांना दिल्याचे त्यांनी म्हटले. यावर त्यांनी गुरुवारी एमएमआरडीए कार्यालयात विशेष बैठक आयोजित केली होती.
गायमुख ते फाऊंटन हॉटेल दरम्यानच्या रस्त्याचे वाढते महत्त्व व भविष्यातील वाढत्या वाहतुकीची गरज लक्षात घेत प्रस्तावित मेट्रो प्रकल्प १० सोबतच या रस्त्याचे ३० मीटरवरून ६० मीटर रुंदीकरण करून त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, असा प्रस्ताव सरनाईक यांनी बैठकीत मांडला. भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ता रुंदीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांनी या प्रस्तावाला मान्यता देत रस्त्याच्या रुंदीकरणाचा खर्च मेट्रो प्रकल्प १० सोबतच करण्याचे मान्य केले.
रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचा आर्थिक भार कोण उचलणार, हा महत्त्वाचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला असता मिरा-भाईंदर महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता सुमारे १५० कोटी रुपयांचा भूसंपादनाचा खर्च महापालिकेऐवजी एमएमआरडीएने करावा, अशी विनंती पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी एमएमआरडीए आयुक्तांना केली. त्याची दखल घेत एमएमआरडीए आयुक्तांनी भूसंपादनाचा संपूर्ण खर्च एमएमआरडीए उचलणार असल्याचे स्पष्ट करुन त्याचे धोरण निश्चित केले. तर भूसंपादनाची प्रक्रिया पुढील आठवड्यातच सुरू करण्याच्या सूचना सरनाईक यांनी संबंधित यंत्रणांना केल्याने रस्ता रुंदीकरणातील आर्थिक अडथळा दूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर पावसाळ्यात वारंवार उद्भवणाऱ्या खड्ड्यांची समस्या निकाली निघणार असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे वाहनचालक व लोकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होऊन त्याचा फायदा मिरा-भाईंदर, घोडबंदर व आसपासच्या परिसरातील लोकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय
मागील पावसाळ्यात फाऊंटन हॉटेल येथील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिरा-भाईंदर महापालिकेकडे सोपविण्यात आली होती. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सत्ताधारी भाजपने विरोध करीत रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी पुन्हा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्याचा ठराव तत्कालीन महासभेत मंजूर केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.