राजापूर : यापूर्वी जुलै 2021ला तालुक्यात झालेल्या अतीवृष्टीत अर्जुना नदीला आलेल्या महापुरात आतोनात नुकसान होवून काही दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेल्या पाचल-तळवडे पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्यासंदर्भात केलेल्या घोषणा हवेतच विरल्या आहेत हे त्या पुलासंदर्भात शासकीय पातळीवरुन काहीही न झालेल्या हालचालीवरुन पुढे आले आहे. मात्र धोकादायक बनलेल्या त्या पुलाच्या जागी नवीन पुलाचे बांधकाम न झाल्यास यापुढेदेखील धोका कायम राहणार आहे. यावर्षीही नवीन पुलाबाबत काहीच हालचाली दिसत नाहीत असेच चित्र समोर आले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या अतीवृष्टीनंतर अर्जुना नदीला येणाऱ्या महापुराचे पाणी पाचल - तळवडे पुलावरुन वाहते.त्यानंतर प्रदीर्घकाळ वाहतूक बंद असते असे मागील अनेक वर्षात पहायला मिळाले आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्याने व वाहतूक बंद पडत असल्याने जामदा परीसराचा पाचलशी असलेला संपर्क तुटतो व जनजीवनावर त्याचे परीणाम होतात शैक्षणिक सह दैनदिन बाजार, खरेदी, वैद्यकीय सेवा यासह अन्य कारणांसाठी जामदा परीसरवासीयाना पाचल वर अवलंबुन रहावे लागते आणि मुसळधार पावसानंतर आलेल्या महापुरामुळे पुलावरील वाहतूक बंद पडल्यानंतर जामदा परीसरवासीयाना अडचणीन्ना सामोरे जावे लागते .
चार वर्षांपूर्वी पावसाळ्यात जुलै दरम्यान सर्वत्र जोरदार अतीवृष्टी झाली होती. त्यावेळी झालेल्या मुसळधार अतीवृष्टीत अर्जुना नदीला आलेल्या महापुराने हाहाकार उडवला होता याचा पाचल-तळवडे पुलालाही मोठा दणका बसला होता. अर्जुनेच्या महापुरातुन वाहुन आलेल्या लाकड्यांच्या ओंडके आदळल्यामुळे या पुलाचे संरक्षण कठडे वाहुन गेले होते. तर पुलावर मोठमोठे खड्डे पडत पुलाचा काही भाग तर चांगलाच खचला होता. परीणामी पाचलकडून तळवडे, ताम्हानेसहीत जामदा परीसराकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद पडली होती. महापुरात पूल खचल्याने वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागतर्फे पुलाची तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी केली गेली.
विवराप्रमाणे पडलेले मोठे खड्डे बुजवण्यात आले. दरम्यान लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यानी पुलाची पहाणी करत त्या जागी उंचीचा नवीन पूल बांधण्याबाबतच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या .त्यानुसार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुमारे चार कोटी अंदाजपत्रकाचा आराखडा तयार करण्यात आला आणि तो शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती पुढे आली. पण अद्याप त्यावर कोणतीच हालचाल झालेली नाही असेच आजचे वास्तव आहे. अनेक वेळा त्याची डागडुजी करावी लागली आहे. शासनाने मनात आणले असते तर केव्हाच येथे चांगला पूल उभा राहिला असता. पण तसे चित्र दिसत नाही. यावर्षी देखील नवीन पूल बांधण्याबाबत कोणत्याच हालचाली दिसत नाहीत.
विद्यमान पूल हा कमी उंचीचा असल्याने महापुरात वाहुन येणारी मोठमोठी लाकडे, ओंडके यामुळे पुलाच्या कठड्यासाठी असलेले रेलिंग वाहुन जातात हा सुध्दा अतापर्यंतचा आलेला अनुभव आहे .