Oxygen Land Project pudhari photo
रायगड

Oxygen Land Project : बामणडोंगरीचा डोंगर पोखरून 'ऑक्सिजन लॅण्ड'

भूस्खलनाच्या भीतीने आदिवासी वाडी व्हेंटिलेटरवर; नैसर्गिक भूभागच बदलला

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : विक्रम बाबर

कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील कल्हे गावालगत असलेल्या बामणडोंगरी आदिवासी वाडीच्या शेजारी सुरू असलेल्या ऑक्सिजन लॅण्ड या बंगलो प्रकल्पामुळे स्थानिक आदिवासी कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे आगामी पावसाळ्यात भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कर्नाळा परिसर हा जंगलसदृश आणि डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो. खिंडीचा भाग असल्याने येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. या परिसरात अनेक आदिवासी वाड्या असून, कल्हे गावाजवळील बामणडोंगरी वाडीत सुमारे २० ते २१ आदिवासी कुटुंबे अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत.

नैसर्गिक भूभागाचे स्वरूप बदलले

दरम्यान, वाडीच्या लगतच्या खासगी जागेवर ऑक्सिजन लॅण्ड नावाचा बंगलो प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर डोंगर कापून जमीन सपाट करण्यात आली आहे. प्लॉटिंग करून भूखंडांची विक्री करण्यासाठी सुरू असलेल्या या कामामुळे नैसर्गिक भूभागाचे स्वरूप बदलल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. स्थानिक रहिवासी रमेश (रम्या) वाघमारे, संजय वाघमारे यांनी ग्रामपंचायतीकडे याबाबत तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले. "आमच्या घरांच्या अगदी बाजूलाच डोंगर पोखरण्यात आला आहे.

मुसळधार पाऊस झाल्यास जमीन खचण्याची किंवा मातीचा ढिगारा घरांवर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे," असे त्यांनी सांगितले. एकीकडे शासन आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना आणि आराखडे तयार करत असताना, दुसरीकडे अशा प्रकारे संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्नही स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत. संबंधित महसूल, ग्रामपंचायत, वन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी तातडीने संयुक्त पाहणी करून परिस्थितीची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी आदिवासी बांधवांकडून करण्यात येत आहे.

ऑक्सिजन लॅण्ड की ऑक्सिजनचा बळी ?

बामणडोंगरी आदिवासी वाडीच्या शेजारी उभारल्या जात असलेल्या "ऑक्सिजन पार्क" प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अनेक झाडे तोडून नैसर्गिक हिरवाई नष्ट करण्यात आली असून, पर्यावरणाचा ऱ्हास करून उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पाला "ऑक्सिजन पार्क" असे नाव देण्यात आल्याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. "ज्याठिकाणी ऑक्सिजन निर्माण करणारी झाडेच तोडली गेली, त्या प्रकल्पाला ऑक्सिजन पार्क म्हणणे ही पर्यावरणाची थट्टाच आहे," अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

बामणडोंगरी येथील आदिवासी बांधवांच्या घराशेजारी सुरू असलेल्या 'ऑक्सिजन पार्क' प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरण्यात आल्याने स्थानिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. विशेषतः पावसाळ्यात भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असून, यामुळे आदिवासी कुटुंबांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो. प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी.
वैशाली विनोद पवार, माजी ग्रामपंचायत सदस्या, कर्नाळा ग्रामपंचायत
महसूल विभागाने पंचनामा केला आहे. मागणी असेल तर संयुक्त पंचनामाही केला जाईल. नियमानुसार योग्य कार्यवाही त्वरित केली जाईल.
जितेंद्र इंगळे, तहसीलदार, पनवेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT