

पुढारी वृत्तसेवा
आगरवाडा चोपडे पंचायतीच्या पंचायत फंडात एकूण २ कोटी ५० लाख ४५ हजार ९६९ इतका निधी असल्याची माहिती पंचायत सचिवांनी दिली. आगरवाडा चोपडे पंचायतीच्या ग्रामसमेत एका नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नावर ही माहिती दिली. मोठ्या प्रमाणात निधी असतानाही पंचायत क्षेत्रातील विकासकामे का मार्गी लागत नाही, असा प्रश्नही यावेळी विचारण्यात आला. पंचायतीच्या या कारभारामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. सरपंच शिल्पा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ग्रामसभेला उपसरपंच संगीता नाईक, पंच भगीरथ गावकर, अँथोनी फर्नांडिस, सचिन राऊत, हेमंत चोपडेकर, सचिव करिष्मा मोरजकर आदी उपस्थित होते. सचिव करिष्मा मोरजकर यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत सादर केला. त्याला मंजुरी दिल्यानंतर अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित नागरिकांनी विविध प्रश्न उपस्थित करून पंचायत मंडळाला धारेवर धरले पंचायत क्षेत्रात वाढत्या प्रकल्पांबाबत प्रश्न उपस्थित करून नागरिकांनी पंचायत क्षेत्रात जागा उपलब्ध नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. भविष्यात अशा मोठ्या प्रकल्पांना मान्यता देऊ नये, असा ठरावही मंजूर करण्यात आला. पंचायत क्षेत्रात वीज व पाणी आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध नाही. विजेच्या दाबाचा प्रश्न निर्माण होत असल्याने नळाला पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे यापुढे कुठल्याही आस्थापनांना मंजुरी देऊ नये, असा ठराव यावेळी मांडण्यात आला. पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये येणारे प्रकल्प, हॉटेल्स यांना वीज व पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे स्थानिकांना त्याचा परिणाम भोगावा लागतो. त्यामुळे अशा आस्थापनांना यापुढे पंचायतीने मंजुरी देऊ नये अशी मागणी नागरिकांनी केली. पंचायत क्षेत्रातील गटारे उपसण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पंचायत निधी खर्च केला जातो. मात्र, हे काम व्यवस्थित होत नाही याबद्दल उपस्थित नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देण्यात आला. पंचायतीने आंबेडकर पुतळ्याजवळ बसलेला जाहिरीतीचा डिजिटल बोर्ड प्रवाशांना त्रासदायक होतो तसेच त्यावर दाखवण्यात येणारी चित्रे अश्लील असल्याने त्याकडे वाहन चालकांचे लक्ष राहते अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते काढून टाकावेत. तसेव या ठिकाणी दिशादर्शक फलक चुकीचे लावण्यात आलेले आहेत, त्यातही दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली. पंचायत क्षेत्रातील रस्त्याच्या शेजारी मासे विक्रेते भाजीविक्रेती बसत असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पंचायतीचे मासळी मार्केट असताना अशा प्रकारे रस्त्यावर मासळी विक्रेते बसत असल्याने अपघाताला निमंत्रण असल्याचे नागरिकांनी पंचायतीच्या निदर्शनास आणून दिले असता अशा विक्रेत्या विरुद्ध पोलिस स्थानकात तक्रार करण्यात येईल असे सांगण्यात आले. चोपडे येथे भातशेतीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी जलसिंचन खात्याने बांधलेल्या ओहोळावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यावर पंचायतीने योग्य ती कारवाई केली का, असा प्रश्न विचारला असता त्या संदर्भात संबंधित खात्याकडून पंचनामा करून कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले उचलल्याची सांगितले. संबंधित आस्थापनाविरुद्ध जलसिंचन खाते न्यायालयात गेले असून, त्यामुळे हा विषय न्यायालयीन पातळीवर हाताळला जात असल्याचे सांगण्यात आले.
उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करा...
पंचायत क्षेत्रात अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा फेकण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावर पंचायतीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आगरवाडा चढणीवर मोठ्या प्रमाणामध्ये कचरा फेकण्यात येतो. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सरपंचांनी दिली,
घरपट्टी वसुलीसाठी नोटिसा बजावा...
पंचायत क्षेत्रातील कर थकबाकीदारांना घरपट्टी व इतर कराबाबत कारणे दाखवा नोटिसा पाठवाव्यात. त्यासाठी चार-पाच वर्षे थांबू नये. त्यामुळे घरपट्टी इतर कर एकत्रित भरणे शक्य होत नाही, असे यावेळी नागरिकांनी सांगितले. पंचायतीतर्फे कचरा गोळा केला जातो. मात्र, गोळा केलेला कचरा नदीत फेकला जात असल्याबद्दल नागरिकांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एमआरएफ शेड लवकरात लवकर उभारावी अशी मागणी केली.