खाडीपट्टा : रघुनाथ भगवत
महाड खाडीपट्टयातील मौजे रावढळ ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले ओंकारेश्वर हे स्वयंभू देवस्थान असून श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. ओंकारेश्वरवर अफाट श्रद्धा असल्याने श्रावणी सोमवारी पंचक्रोशितील भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात.
महाड शहरापासून अवघ्या 10 किमी अंतरावर खाडीपट्टयातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील बाणकोट-भोर रस्त्यावरील रावढळ हे गाव असून या गावाच्या तलावा समोर दक्षिणेस ओंकारेश्वर असे हे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधण्यात आले असून त्यापूर्वी त्या ठिकाणी गाभार्यात स्वयंभू पाषाणाची शिवपिंडी होती आणि पाषाणाचा जुना कठडा बांधण्यात आला होता अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
या ओंकारेश्वर मंदिराअगोदर ग्रामदेवता श्री काळभैरव, जोगेश्वरी व रवळनाथाचे तसेच धरणी व करणी, साती आसरा माता मंदिर आहे. या मंदिरानंतर तेथील रस्त्याने थेट पुढे ओंकारेश्वर मंदिराकडे पायी चालत जाता येते. तेथील हे मंदिर स्वयंभू असल्याने शिवभक्तांची पवित्र श्रावण महिन्यात प्रत्येक श्रावणी सोमवारी सकाळपासूनच अभिषेक पूजा बिल्वअर्चन विधी अखंडपणे चालू असते. ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या ठिकाणी प्रति वर्षी महाशिवरात्रीला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ओंकारेश्वराची त्रिकाल पूजा केली जाते सकाळी पहाटे ओंकारेश्वरला रुद्राभिषेक करून त्याची षोड्पचार पुजा केली जाते. तसेच 1 हजार बिल्वअर्चन विधी साजरा केला जातो. संध्याकाळी पूजा, आरती होते आणि रात्री सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूजा तसेच ग्रंथराज शिवलीलामृत पारायण होते व पहाटे पुन्हा पूजा, आरती करण्यात येते त्यानंतर दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होते.
ओंकारेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार माघ कृष्ण 14 शके 1929 महाशिवरात्र 6 मार्च 2008 रोजी काशिनाथ गोविंदशेठ टक्के यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सर्व नातवंडांनी मिळून केला असल्याची नोंद या मंदिराच्या ठिकाणी लावलेल्या पाटीवरून पहावयाला मिळते. ओंकारेश्वराचे स्वयंभू स्थान निसर्गरम्य परिसरात वसलेले असून गावाच्या दक्षिणेस असलेले ओंकारेश्वर मंदिराच्या आजूबाजूला एकही घराची वस्ती नसल्याने या ठिकाणी अभूतपूर्व शांतता असून ओंकारेश्वर पिंडीजवळ गेल्याने मन शांत व प्रसन्न होऊन एकाग्रचित्त होते व तेथे शांतताच मनाचा वेध घेऊन भक्ती करण्यास भावना उत्पन्न होते.
आता पावसाळ्यात या ठिकाणी सर्वत्र हिरवेगार गवत आणि झाडांनी परिसर बहरलेला दिसतो. त्यामुळे हिरव्यागार कुशीत वसलेले हे ओंकारेश्वर मंदिर रावढळ पासून सापे-वामणे गावाकडे जाणार्या नागरिकांचे मन आकर्षित करते. बाजूलाच असलेले ग्रामदेवता श्री काळभैरव, जोगेश्वरी मंदिर अतिशय देखणे बांधलेले असून या मंदिराला विस्तृतपणे सभामंडप बांधलेला देखील आहे. याच सभामंडपातून ओंकारेश्वर मंदिराकडे जुन्या पायवाटेने चालत जावे लागते. ग्रामदेवतेच्या मंदिरापर्यंत काँक्रीटचा रस्ता थेट रावढळ येथून पुढे आंबवलीकडे गेलेल्या डांबरीकरणाच्या रस्त्यापासून गेला आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी फुललेला हिरवागार परिसर भाविकांना नामघोषात तल्लीन राहण्यास प्रेरित करीत असतो.