

रायगड : रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या राज दरबारात उभे राहिल्यानंतर ईशान्यकडे नजर वळवली की ठळकपणे उठून दिसते ते दिमाखात उभे असलेले रायगडावरील श्री जगदीश्वराचे मंदिर. किल्ल्यावरील स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना. हिरोजी इंदुलकरांची एक उत्कृष्ट निर्मिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अलोट भक्ती असलेले हे देवालय.
शिवमंदिराच्या गाभार्यात जाताना पायरीवर असलेले यक्षमुख (कीर्तीमुख) जगदीश्वराचा पूर्व दरवाजावर आढळते! अशी दोन यक्षमुखे दरवाज्याच्या वरील बाजूस अत्यंत सुबकरीत्या कोरलेली आहेत! दरवाजातून आत प्रवेश केले की फरसबंदी परकोटात बांधलेल्या ओवर्या नजरेस पडतात.
जगदीश्वर मंदिरातून बाहेर आल्यावर एक गोष्ट जाणवते ती म्हणजे या मंदिराची रचना ही एखाद्या मंदिरासारखी नसून एखाद्या मशिदीसारखी आहे. देवळाचा कळस हा एखाद्या मशिदीच्या घुमटासारखा आहे व चार बाजूस छोटे मिनार आहेत. काहींच्या मते मागेपुढे जर मुघली आक्रमण झालेच तर देवळाचे मुघलांपासून संरक्षण करण्याकरिता त्याचे बांधकाम मुसलमानी शैलीचे असले पाहिजे. खालून गडावर तोफांचा मारा होताना मशिदीसारखे बांधकाम दिसते म्हणून मुघल तोफांचा मारा मंदिरावर करणार नाहीत असेही काहींचे म्हणणे आहे. दुसरी गोष्ट, 1689 नंतर 40 वर्ष रायगडावर सिद्दीचा अंमल होता. त्यामुळे ही मशीद नसून मंदिर आहे हे कळायला त्याला फक्त दरवाजाचा चौथरा ओलांडून आत यावे लागले असते! अन् सिद्दीच्या माणसांनी केलेल्या हानीच्या खुणा आजही दिसतात! भंगलेला नंदी, गायब झालेले मूळचे शिवलिंग हे त्या धार्मिक आक्रमणाची साक्ष देतात!
जगदीश्वराचे मंदिर आयताकृती असून त्याला पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशांना तीन दरवाजे आहेत. तर जगदीश्वराच्या परकोटाला दोन दरवाजे आहेत. यापैकी रायगडच्या नगारखान्याची प्रतिकृती असलेला मुख्य दरवाजा पूर्वेकडे आहे. पूर्वेचा दरवाजा अत्यंत सुबक असून त्यावर कोरीव नक्षीकाम दिसून येते. मंदिरासमोर एक सुंदर दगडी नक्षीकाम केलेला नंदी आहे. मंदिराचा परिसर 14 हजार चौरस फूट इतका आहे.
छत्रपती शिवरायांची निस्सीम भक्ती असल्याने मंदिराची स्थापत्य कला लक्षवेधी आहे. शिवमंदिराच्या गाभार्यात जाताना पायरीवर असलेले यक्षमुख जगदीश्वराच्या पूर्व दरवाजावर स्पष्टपणे दिसून येते. अशी दोन यक्षमुखे दरवाज्याच्या वरील बाजूस कोरली आहेत. दारातून आत प्रवेश केला की फरसबंदी परकोटात बांधलेल्या ओव्या नजरेस पडतात. मंदिराचा गाभारा प्रशस्त आणि भव्य असा आहे.