संतोष गायकवाड, निजामपूर
“शिवकाळातील प्रमुख लष्करी ठाणं” अशी ओळख असणाऱ्या निजामपूर विभागाचा वाढत्या औद्योगिकिकरण व पर्यटनातून विकास होत आहे. सध्या निजामपूर शहर ही परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. या शहराच्या जवळच मानगड किल्ला व कुर्डुगड (विश्रामगड)किल्ला आहे. मानगड वरुन तालुक्याचं नाव माणगाव पडलं असावं असं जाणकार सांगतात. मानगड व कुर्डुगड याठिकाणी जाण्यासाठी ही पायवाट अडचणीची आहे. कुर्डुगड हा दुर्लक्षित राहिला आहे. गडावर जाण्यासाठी पायवाटेेशिवाय पर्याय नाही. मानगडावरिल बुरुज व इतर काही डागडुजीची कामे सध्या सुरु आहेत.
अंदाजे तीन कोटी पर्यंत निधी उपलब्ध झाला आहे. जास्तीचा निधी उपलब्ध करून दिल्यास मानगड पुन्हा एकदा त्याच तेजाने प्रकाशमान होईल. बोरवाडी ते मानगड किल्याकडे जाणारा रस्ता खुपच अरुंद असल्याने शिवप्रेमींंनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे शिवकालीन तलाव येथिल वैभव वाढवतो. प्रमुख बाजारपेठ असुन सर्व जाती धर्माचे लोक शहरात गुण्या गोविंदाने राहतात. “निजामपूर“ ला “श्रीरामपूर“ या नावानेही ओळखतात. शहराच्या मध्यभागी श्रीरामांचं मंदिर आणि समोरच श्री हनुमानाचं मंदिर आहे.
शहराचा वाढता विकास पाहता विभागातील जनसामान्य निजामपूरकडे वळलेला दिसतो. याच शहरातुन पुण्याकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे परिसरात शहरिकरण वाढत आहे. दक्षिण रायगडमधुन पुणे शहराकडे जाणाऱ्या एसटी बसेस येथुन जात असल्याने निजामपूर शहराला महत्व प्राप्त झाले आहे. दिवसभरात अंदाजे पंचवीस ते तीस एस टी फेऱ्या या मार्गावर धावत असतात. याच मार्गावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेले कोंडेथर घाट (ताम्हाणी) ही पहायला मिळतो. पावसाळ्यात निर्माण होणारे धबधबे पाहण्यासाठी लाखो पर्यटक येथे येतात. या घाटाला स्थानिक कोंडेथर गावाच्या नावाने न ओळखता येथून पन्नास कि.मी. अंतरावर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील ताम्हीणी या गावाच्या नावाने ओळखले जाते या बाबत स्थानिकांमध्ये नाराजी आहे.
जवळच कुंभे धरणाचं काम चालु आहे. येथे काळ कुंभे जलविद्युत प्रकल्प होणार असुन महाड व माणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार संधीसह विभागात पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी पाण्याची व्यवस्था या प्रकल्पामुळे होणार आहे. काही कारणास्तव या प्रकल्पाचे काम रखडले आहे. कुंभे गाव नव्याने निर्माण करण्यात आला. परंतु विस्थापितांच्या समस्या मात्र जैसे थे आहेत. कुंभे धरण परिसर पावसाळ्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटनाचा व्हायला पाहिजे तसा फायदा स्थानिक ग्रामस्थांना झालेला नाही. या धरण परिसरात मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. येथिल स्पॉट दिग्दर्शकांना भुरळ घालत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा नायक अतुल कुलकर्णी व नायीका प्रिया बापट यांच्या हॅप्पी जर्नी चित्रपटाचे चित्रीकरणही याच धरण परिसरात झाले आहे. तसेच कोंडेथर (ताम्हाणी) घाट परिसरात सुप्रिया व सचिन पिळगावकर यांची प्रमुख भुमिका असलेला नवरा माझा नवसाचा या धम्माल विनोदी चित्रपटाच्या काही भागांचे चित्रिकरण या परिसरात झाले असुन निजामपूर बाजारपेठेतही अनेक हिंदी मराठी चित्रपटांचे चित्रीकरण पार पडले आहे. त्यामुळे निजामपूर विभागासह शहराला एक वेगळी ओळख मिळाली आहे.
येथे भिरा जलविद्युत प्रकल्प हे आशिया खंडातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले विद्युत केंद्र आहे. तसेच रवाळजे येथे ही एमएसईबीचे वीजनिर्मिती केंद्र आहे. त्याचप्रमाणे भिरा येथिल कुंडलिका नदीचं उगम स्थान असणारं देवकुंड हे ठिकाणही गेल्या काही वर्षात चर्चिले जात आहे. देशभरातुन हजारो पर्यटक या ठिकाणी धबधबा पाहण्यासाठी येत असतात. देवकुंडच्या काही अपघातात्मक घटना वगळता येथे पर्यटकांची तुफान गर्दी पहायला मिळते ट्रेकर्सची संख्या देखील दिवसेंदिवस वाढताना दिसते. या परिसरात देवकुंडमुळे प्रत्येक घरात नविन रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. महिलांच्या हाताला काम मिळाला आहे. महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातुन देवकुंड धबधबा या ठिकाणाला पर्यटनाचा दर्जा दिला गेल्याने या ठिकाणी पर्यटकांसाठी रस्ते व ईतर सोयी सुविधांसाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामपंचायत पाटणुस यांनी देखिल पर्यटकांसाठी नियमावली तयार करून त्यामार्फत प्रशासनाला सहकार्य केले जात आहे. देवकुंड वॉटरफॉल, सिक्रेट पॉईंट, कोंडेथर, चन्नाट, कुंभे वॉटरफॉलमुळे पावसाळी पर्यटन वाढले आहे.
निजामपूर शहराच्या मध्यभागाला जोडुन रायगड किल्ल्याकडे जाणारा जोडरस्ता आहे. निजामपूर शहरापासून तीस कि.मी. अंतरावर ऐतिहासिक रायगड किल्ला आहे. पुणे तसेच घाटमाथ्यावरिल लाखो शिवभक्त याच मार्गाने रायगडकडे प्रयाण करित असतात. किल्ले रायगडकडे जाण्याऱ्या प्रमुख मार्गांपैकी निजामपूर पाचाड - रायगड हा मार्ग प्रवासासाठी सुखरून व शॉर्ट कट मानला जातो. सदरिल रस्ता तळा - इंदापूर -निजामपूर पाचाड - मार्गे दापोली असा असणार आहे. या रस्त्याच्या रुंदिकरणामुळे निजामपूर ते पाचाड अशी रोजगाराची संधी उपलब्ध झाली असुन हॉटेल व्यवसायीकांनी याचा पुरेपुर फायदा घेतला आहे. माणगाव - महाड कडून रायगड असा प्रवास केल्यास 60 कि. मी. चा फेरा पडत असल्याने निजामपूर - रायगड हे 30 कि.मी. अंतर असणारा हा मार्ग प्रवाशांना सोयीचा वाटतो. पुणे मुंबई कडुन येणारे पर्यटक या मार्गावरून सुरक्षित प्रवास करतात.
निजामपूर पासुन जवळच असणारं जुनं प्रसिद्ध मंदिर म्हणजे कडापे येथिल श्री बापुजी बुवा व श्री कालिकाईमाता देवस्थान. भक्तगण श्रद्धेने याठिकाणी येत असतात. झी मराठी वरील एका विशेष कार्यक्रमात या देवीची महती सांगणारी मालिका प्रदर्शित झाली होती. नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती आहे. निजामपूर मधे प्राचीन काळापासून असणारे मंदिरं निदर्शनास येतात या विषयी येथिल इतिहास अभ्यासक रामजी कदम यांनी लिहिलेल्या पुस्तकातुन दिसुन येते. शिवाय या परिसरात आणखी एका मंदिराचा उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे बोंडशेत येथिल श्री काळभैरव देवस्थानचा. निजामपूर पुणे महामार्गावरील बोंडशेत येथे असणारं काळभैरवाचं मंदिर भक्तांचं श्रध्दास्थान आहे. मंदिराची बांधणी देखणी असुन या मंदिरात दर्शनासाठी भग्तगण दरवर्षी येत असतात.
निजामपूर विभागात डीएमआयसी अंतर्गत भुसंपादन सुरू आहे. नविन होणाऱ्या भाले व जामगाव ग्रामपंचायत हद्दीतील एमआयडीसी ला स्थानिक शेतकऱ्यांकडून पुर्ण संमती मिळाली असुन या माध्यमातून निजामपूर मध्ये 50 हजार रोजगार निर्माण होतील त्यामुळे भविष्यात निजामपूर शहर हे रायगड जिल्ह्याच्या नकाशावर ठळकपणे दिसेल यात शंका नाही. जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी एमआयडीसी वरचीवाडी व भागाड ग्रामपंचायत हद्दीतील विळे भागाड औद्योगिक क्षेत्रामधे विविध कंपन्या कार्यरत आहेत. यामध्ये जगप्रसिद्ध पोस्को स्टील महाराष्ट्र ही अंतरराष्ट्रीय कंपनी सध्या मोठ्या प्रमाणात स्टीलचे उत्पादन घेत आहे. पोस्को स्टील महाराष्ट्र या कंपनीच्या सीएसआर फंडातुन निजामपूर विभागासह संपुर्ण रायगड जिल्ह्यात लोकाभिमुख योजना राबवल्या जात आहेत. कोरोना काळात या कंपनी कडुन संपुर्ण जिल्ह्यातील मास्क. सॅनिटायझर. पीपीई कीट व ईतर वैद्यकीय साहीत्याचे वाटप करण्यात आले. पोस्को स्टील महाराष्ट्र कंपनीच्या सहकार्याने निजामपूर विभागासाठी सुसज्ज असे हॉस्पिटल निजामपूर शहरात उभारावे अशी आशा या विभागातील जनतेतुन व्यक्त होत आहे. या विभागात एमआयडीसीच्या माध्यमातून विकासाची गंगा येणार असुन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी राजकीय प्रयत्न होणे गरजेचे आहे.