

महाड : श्रीकृष्ण बाळ
नुकत्याच झालेल्या महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे बदलाचा कौल दिला आहे. एकूण 17 नवीन नगरसेवक निवडून आले असून नगराध्यक्षांसह फक्त 3 विद्यमान नगरसेवकांना महाडकरांनी पुन्हा संधी दिली आहे.
या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांनी नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली होती. नागरिकांनीही अपेक्षेप्रमाणे नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांना विजयी केले. यामुळे नगर परिषदेत नव्या विचारांचा आणि नव्या कार्यशैलीचा प्रवेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या निवडणुकीत दोन्ही परस्पर विरोधी पक्षांकडून फार कमी विद्यमान नगरसेवकांना संधी देण्यात आली होती. निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या विद्यमान नगरसेवकांमध्ये वजीर कोंडीवकर, संदीप जाधव व प्रमोद महाडिक यांनी अत्यंत संघर्षात्मक झालेल्या निवडणुकीत आपले गट राखण्यात यश प्राप्त केले असल्याचे दिसून आले. प्रभाग तीन मधून प्रमोद महाडिक प्रभाग पाच मधून वझीर कोंडीवकर व प्रभाग सात मधून संदीप जाधव यांनी पुन्हा नगर परिषदेमध्ये प्रवेश केला आहे.
निवडून आलेल्या नगरसेवकांसमोर आता नागरिकांनी दाखवलेला विश्वास टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व पारदर्शक कारभार यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. , असा सूर महाडकरांतून व्यक्त होत आहे.
महाड नगर परिषद निवडणुकीचा निकाल हा जागरूक मतदारांचा स्पष्ट संदेश मानला जात असून, काम करणाऱ्यालाच संधी हे समीकरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
महाड नगर परिषदेच्या आजवरच्या निवडणूक इतिहासामध्ये डोकाविले असता एवढ्या मोठ्या संख्येने नवीन चेहऱ्यांना नागरिकांनी दिलेली पसंती प्रथमच असल्याचे मानले जात असल्याने शहराच्या विविध विभागातून असलेल्या समस्यांच्या पूर्ततेसाठी नगराध्यक्षांचा असलेल्या अनुभवाचा लाभ घेऊन त्यांना आपल्या प्रभागांमध्ये विकासात्मक कामांवर जोड द्यावा लागेल असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर महाडच्या नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या सत्तांतराचे दूरगामी परिणाम महाडच्या राजकारणावर होण्याचे हे सूचक संकेत मानले जात असून भविष्यकाळातील वाटचालीसाठी या नव्या दमाच्या नगरसेवकांना प्रभागातील विकासात्मक कामांना गती देऊन जनतेचा विश्वास संपादन करण्याची मोठी कामगिरी करावी लागणार आहे.