उरण: बेंगलोर येथील फॅक्टरीमधून न्हावा शेवा बंदरात एक्स्पोर्टसाठी आणलेल्या एका कंटेनरमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 13 लाख 56 हजार 577 रुपये किमतीचे 1,170 लेडीज ड्रेस चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात कंटेनर चालक आणि त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाही एक्स्पोर्ट प्रा. लि. या फॅक्टरीमधून अमेरिकेतील गोलमार्ट कंपनीसाठी लेडीज ड्रेस तयार केले जातात. कंपनीचे सिनियर मॅनेजर सचिन सत्यनारायण शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गोलमार्ट कंपनीने खरेदी केलेले 6,640 लेडीज ड्रेसेस एकूण 548 कारटुन बॉक्समध्ये पॅक करून बेंगलोर येथील पिनीया फॅक्टरीमधून न्हावा शेवा पोर्टवर आणण्याचे काम ओम लॉजिस्टिक सप्लाय चेनला देण्यात आले होते. ओम लॉजिस्टिकने यासाठी पुजा ट्रान्सपोर्ट कडून 20 फुटी बंद कंटेनर मोटर ट्रेलर क्र. केए-52-सी-3817 हा भाड्याने घेतला होता.
11 मे रोजी चालक केंम्पाहीय्या जी. हा या गाडीत माललोड करून न्हावा शेवा येथील स्पिडी सी.एफ.एस. यार्डच्या दिशेने निघाला. 13 मे रोजी हा कंटेनर उरणमधील सोनारी गावातील स्पिडी सी.एफ.एस. यार्ड येथे पोहोचला.
तेथे कंपनीच्या प्रतिनिधींनी मालाची तपासणी व सर्व्हे केला असता, काही कारटुन बॉक्सचे वजन कमी भरल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशय आल्याने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व 548 कारटुन बॉक्स उघडून तपासले असता, त्यापैकी 197 कारटुन बॉक्समधून एकूण 1,170 लेडीज गारमेंटचे ड्रेस गायब असल्याचे आढळले.
या चोरीबाबत गाडीचा चालक केंम्पाहीय्या जी. याच्याकडे विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद येत होता. तो आपला कंटेनर स्पिडी सी.एफ.एस. येथेच सोडून पळून गेल्याचे उघड झाले. यानंतर कंपनीने कंटेनरमधील जी.पी.एस. सिस्टीमची तपासणी केली असता, ही गाडी 13 मे रोजी उरणमधील द्रोणागिरी येथील भैरीदेवी मंदिराजवळ भेंडखळ रोडवर थांबलेली असल्याचे दिसून आले.
याच दरम्यान चालकाने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने हा साडेतेरा लाखांचा माल चोरल्याची खात्री कंपनीला झाली.या प्रकरणी फिर्यादी सचिन शर्मा यांच्या तक्रारीवरून न्हावा शेवा पोलिसांनी चालक केंम्पाहीय्या जी. व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी दीपक विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जयकर पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.