पनवेल: नवीन पनवेल शहराला नियमित पाणीपुरवठा करावा ,नागरिकांची गैरसोय दूर करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीने आक्रोश मोर्चा काढत नवीन पनवेल सिडको कार्यालयासमोर निदर्शने केली आणि नवीन पनवेल शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी सोबत आणलेले मातीचे हांडे सिडको कार्यालयाच्या गेटवर फोडले आणि सिडकोचा निषेध व्यक्त केला.
गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई शहरातील खारघर, कामोठे , कळंबोली तसेच नवीन पनवेल शहरात पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाली आहे. ऐन दिवाळीतही पाण्याच्या टंचाईचा सामना या शहरातील नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे संतापलेले नागरिक रस्त्यावर उतरून मोर्चे, निदर्शने करत शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी करताना दिसत आहेत. नवीन पनवेल शहरालाही अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे.
या शहरातील संतप्त नागरिकांनी महाविकास आघाडीच्याच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून निदर्शने केली आणि सिडकोचा धिक्कार केला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात महिलांनी रिकामे हांडे डोक्यावर घेत नवीन पनवेल येथील सिकडो कार्यालयाला धडक दिली आणि, सिडकोचा निषेध केला. यावेळी संतापलेल्या महिलांनी सोबत आणलेले मातीचे हांडे सिडको कार्यालयाच्या गेटवर फेकत सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली.
यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, काँग्रेसचे नेते हरीश केणी, शेकाप नेते काशिनाथ पाटील,यासह महाविकास आघाडीचे नेते तसेच नवीन पनवेल शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन पनवेल शहरातील शिवा कॉम्प्लेक्स येथून या आक्रोश मोर्चाला सुरवात झाली आणि शहरातील सिडको कार्यालयावर जाऊन धडक दिली. या आंदोलनाची दखल घेत सिडकोच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चा करून उद्यापासून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.