Belapur Uran Panvel Traffic Pudhari
रायगड

Belapur Uran Panvel Traffic: अटल सेतू-गव्हाणफाटा मार्गावरील सततची वाहतूककोंडी फुटणार; वाहतुकीत बदल

जड वाहने 'वहाळ पुला'च्या डाव्या बाजूने वळवली

पुढारी वृत्तसेवा

उरण: बेलापूर-उरण-पनवेल महामार्गावरील साततीची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि 'अटल सेतू'कडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवास सुसाट व्हावा यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

गव्हाणफाटा वाहतूक विभागांतर्गत वाढलेली अवजड वाहनांची संख्या आणि सुरू असलेल्या पुलाच्या कामांमुळे निर्माण होणारी कोंडी लक्षात घेता, आज म्हणजेच २६ जूनपासून जड वाहनांना वहाळ पुलाच्या डाव्या बाजूने चालवण्याचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, गव्हाणफाटा भागात अवजड आणि अतिविशाल वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे.

त्यातच या भागात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे जंगलकट आणि चिरनेर फाटा परिसरात दररोज मोठी कोंडी होत आहे. या कोंडीमुळे थेट अटल सेतूकडे जाणारी मार्गिका अडकून पडत असून, याचा फटका आपत्कालीन सेवांच्या वाहनांना आणि व्हीव्हीआयपी ताफ्यांना बसत होता.

यावर उपाय म्हणून आता नवीन रचनेनुसार, महामार्गावरून किल्ला जंक्शनकडून गव्हाणफाटाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड वाहनांना वाहल पुलाच्या डाव्या बाजूने जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गव्हाणफाटा येथील वाहतुकीची परिस्थिती पाहून पोलीस या जड वाहनांना पुलावरच काही काळ रोखून धरतील आणि टप्प्याटप्प्याने पुढे सोडतील. जड वाहने डाव्या बाजूने जात असताना, कार आणि इतर हलकी वाहने नेहमीप्रमाणे पुलाच्या उजव्या बाजूने धावतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT