आनंद सकपाळ
नेरळ: नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकी असेलल्या जमीन क्षेत्रात नेरळ विकास संकुल प्राधिकरणाअंतर्गत दोन कोटीचा निधी खर्च करून घनकचरा प्रकप्ल हा उभारण्यात आला, मात्र एक वर्षात सदर घनकचरा प्रकल्प हा बंद पडला आहे.
या प्रकल्पामध्ये कचऱ्यावरील प्रकीया बंद असताना, टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचा ढीग हा वाढत आहेत. सध्या या घनकचरा व्यवस्थापण प्रकल्पाची सध्या पूरती दुरावस्था झाली आहे. तर या घनकचरा प्रकल्पातील असलेली बेलींग मशीन अदृश्यस्थितीत आहे.
नेरळ ग्रामपंचायतीचा डम्पिंग ग्राऊंड हे पूर्वी कर्जत - कल्याण या राज्य महामार्गावर होते व त्या डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याचे विघटन न करता, तो कचरा हा डम्पिंग ग्राऊंडमध्येच पेटवला जात होता. त्यामुळे उटणाऱ्या धुरांच्या लोटामुळे व कच्ाऱ्याच्या येणाऱ्या दुर्गंधीमुळे या परिसरातील सोसायटी मधील राहाणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे व नेरळचे वाढते नागरीकरण पहाता, नागरिकांमधून सदर डंम्पिंग ग्राऊंड दुसरीकडे हलविण्याची मागणी होत होती.
नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकी असलेल्या सर्वे नंबर 18 या जमीन क्षेत्राची शासकीय जमीन मोजणी ही सन 2016 मध्ये करून, या जमीन क्षेत्राला कंपाउंड करून, नेरळ विकास संकुल प्राधिकरणा अंतर्गत तब्बल दोन कोटीचा मंजूर निधी मधून एका खाजगी कंपनी मार्फत घनकचरा प्रकल्पाचे काम करण्यात आले होते.
सदर प्रकल्पाचे काम हे सन 2023 पूर्ण झाल्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून झालेल्या करारानुसार हा घनकचरा प्रकल्प सन2024 पर्यंत एक वर्ष चांगळ्या पद्धतीने सूरू व त्या मध्ये कचऱ्याचे विघटन व कचऱ्यावरील प्रक्रिया व त्यापासून खत देखील बनवले जात होते. त्यानंतर सदर घनकचरा प्रकल्प हा सन 2025 मध्ये या खाजगी कंपनीमार्फत नेरळ ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला होता.
मात्र काही महिने नेरळ ग्रामपंचायतीला हा घनकचरा प्रकल्प चालविण्यात यश आले. त्यानंतर मात्र सदर घनकचरा प्रकल्प सुरू ठेवण्यात नेरळ ग्रामपंचायत ही अपयशी ठरली असल्याने, सध्या हा घनकचरा प्रकल्प बंद स्थितीत पडला आहे. मात्र या बंद घनकचरा प्रकल्पात नेरळ ग्रामपंचायतीमार्फत कचरा हा टाकला जातो. परंतू या टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने, घनकचरा प्रकल्पाच्या आवारात व परिसरात मोठया प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचला आहे.
नेरळ विकास संकुल प्राधिकरणाच्या माध्यमातून दोन कोटीचा निधी खर्च करून नेरळ ग्रामपंचायत मालकी जागेत घनकचरा प्रकल्प सुरू केला मात्र नेरळ ग्रामपंचायतीकडे वर्ग होताच एकाच वर्षात बंद झाला, तर या घनकचरा प्रकल्पाची झालेली सध्या दुरवस्था व या प्रकल्पातील एक बेलींग मशीन जागेवर दिसत नसल्याने, नेमकी मशीन कुठे व कोणी नेली? मशीनचे नेमके काय झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.- गोरख शेख, सामाजिक कार्यकर्ते, नेरळ
सध्या घनकचरा प्रकल्पातील सर्व मशिनरीची दुरूस्ती ही करण्यात आली आहे. हा घनकचरा प्रकल्प चालविण्यासाठी एखाद्या संस्थेची नेमणूक करण्यासंदर्भातील प्रक्रिया ही नेरळ ग्रामपंचायत प्रशासनामार्फत सुरू आहे. ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून, या घनकचरा प्रकल्पामध्ये कचरा विघटन व त्यावर प्रक्रिया करण्याचे काम हे सुरू केले जाईल.- सुजित धनगर, प्रशासक अधिकारी, नेरळ ग्रामपंचायत