

मुरुड जंजिरा: रायगड जिल्ह्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पांमुळे लवकरच एक लाख कोटीची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पांसाठी तंत्रउच्चशिक्षण आवश्यक आहे. यासाठी संस्था चालकांनी विविध कोर्से शिकवण्यासाठी तांत्रिक शाखा कशा निर्माण होतील याकडे लक्ष देणे आवश्यक असून यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करू असे अभिवचन खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर नांदगाव येथील खासदार निधीमधून व गेल कंपनी च्या सी एस आर फंडामधून तीन वर्ग खोल्या बांधण्यात येऊन त्याचा लोकार्पण सोहळ्या प्रसंगी खासदार तटकरे आपल्या भाषणात बोलत होते.
शिक्षणासाठी किमान सुविधा प्राप्त करून देणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. परंतु शिक्षणाबरोबरच तंत्रउचशिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांनी घेणे खूप आवश्यक आहे. साळाव येथे जिंदाल कंपनीकडून आठ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त गुंतवणूक होणार असून कंपनीने याबाबत हालचाली सुरु केल्या असून जिल्ह्यात येणारे नवीन प्रकल्पसाठी तंत्रउचशिक्षण खूप आवश्यक बाब आहे.
रायगड जिल्ह्यातील तरुणांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी विविध संस्था चालकांनी विविध कोर्से शिकवण्यासाठी तांत्रिक शाखा कश्या निर्माण होतील याकडे लक्ष देणे आवश्यक असून यासाठी संस्था चालकांना सर्वोतोपरी सहकार्य करू असे अभिवचन यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
सदरील कार्यक्रमप्रसंगी सहजीवन विद्यामंडळाचे अध्यक्ष फैरोज घलटे, संचालक ॲड. इस्माईल घोले, चिंतामणी जोशी, गणेश गाणार , कृष्णा अंबाजी, अस्लम हलडे , अरविंद भंडारी, मुश्ताक झोंबाडकर , किसन भेर्ले, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर, नगरसेवक मनोज भगत, माजी सभापती स्मिता खेडेकर, अशिका ठाकूर, मुरुड तालुका महिला अध्यक्ष ॲड. मृणाल खोत, सचिव विजय पैर, आगरदांडा सरपंच आशिष हेदुलकर माजी सरपंच अजित कासार, संजय गुंजाळ, अर्चना खोत, प्रतीक पेडणेकर आदी उपस्थित होते.