Crime News pudhari photo
रायगड

Raigad Crime : बंद फ्लॅट फोडून पाच तोळे सोन्यासह रोकड लंपास

नेरळमध्ये घरफोडी; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : आनंद सकपाळ

नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील हजारे नगर परिसरात बंद असलेल्या दोन शेजारील फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे पाच तोळे सात ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मोठी रोकड असा एकूण अंदाजे ३ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. मौजे नेरळ येथील भोपले रोड, हजारे नगर रोड परिसरातील दृष्टी आर्केड इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट बंद असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधली.

फिर्यादी व त्यांची पत्नी हे ठाणे येथे मुलाकडे राहण्यासाठी गेले होते. त्याचप्रमाणे शेजारील फ्लॅटमधील रहिवासीही ठाणे येथे गेले असल्याने दोन्ही फ्लॅट बंद होते. हीच संधी साधत चोरट्यांनी दोन्ही फ्लॅटच्या दरवाजा- वरील लॉक व कडीचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केल्याचे समोर आले आहे.

फ्लॅट क्रमांक २०३ मध्ये प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने उचकून त्यातील सुमारे चार तोळे सात ग्रॅम सोन्याचे दागिने व ७० हजार रुपयांची रोकड, असा अंदाजे २ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी शेजारील फ्लॅट क्रमांक २०२ लाही लक्ष्य केले. या फ्लॅटमधून सुमारे एक तोळा अर्थात १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ७५ हजार रुपयांची रोकड, असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.

या दोन्ही घरफोड्यांमध्ये एकूण पाच तोळे सात ग्रॅम वजनाचे, अंदाजे २ लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड, असा सुमारे ३ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हा पोलीस उपनिरीक्षक वरक करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT