Palghar industrial traffic : अवजड ट्रेलरच्या पार्किंगमुळे बोईसर-चिल्हार मार्गावर अपघातांचा धोका

नागझरी येथे रस्त्यालगत १० ते १२ ट्रेलर ठाण मांडून; वाहतूक शाखेसमोर मोठे आव्हान
Palghar industrial traffic
बोईसर-चिल्हार मार्गावर खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. त्यातच रस्त्यावर जनावरांचा ठिय्या... अशातच रस्त्याच्या मोठ्या भागावर अवजड ट्रेलर उभे राहत असल्याने वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.pudhari photo
Published on
Updated on

बोईसर : बोईसर-चिल्हार मार्गावरील नागझरी परिसरात एका कंपनीकडून विविध प्रकारच्या मोठ्या लोखंडी स्ट्रक्चरच्या निर्मितीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या स्ट्रक्चरची निर्मिती झाल्यानंतर त्यांची मोठ्या ट्रेलरमधून वाहतूक केली जाते. मात्र, सध्या याच औद्योगिक वाहतुकीने बोईसर-चिल्हार मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर केला आहे.

नागझरी येथे मोठमोठे अवजड लोखंडी बार घेऊन आलेले सुमारे १० ते १२ ट्रेलर गेल्या दोन-तीन दिवसांपासून रस्त्यालगत उभे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आधीच मर्यादित असलेल्या रस्त्याच्या उपलब्ध जागेवर मोठ्या वाहनांचा अडथळा निर्माण होत असून वाहतुकीला त्याचा फटका बसत आहे.

Palghar industrial traffic
Palghar Ganesh festival : पालघर जिल्ह्यात बाप्पांच्या आगमनाच्या तयारीची लगबग

विशेषतः समोरून येणाऱ्या वाहनांना या ट्रेलरमुळे आपला मार्ग बदलून पुढे जावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. बोईसर-चिल्हार मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात औद्योगिक वाहतूक सुरू असते. त्यातच रस्त्याची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी असलेले खड्डे, रस्त्यावर फिरणारी जनावरे आणि त्यात भर म्हणून रस्त्यालगत उभी राहणारी अवजड वाहने यामुळे वाहनचालकांसमोर सुरक्षितपणे वाहन चालविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या या ट्रेलरचा अंदाज वाहनचालकांना न आल्यास मागून येणाऱ्या वाहनांची ट्रेलरला धडक होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. मोठ्या लोखंडी बारची वाहतूक करणारे हे ट्रेलर रस्त्याच्या कडेला दीर्घकाळ उभे राहत असतील, तर त्यांच्या पार्किंगची सुरक्षितता, रिफ्लेक्टर, पार्किंग लाइट तसेच वाहतूक नियमांचे पालन याबाबत संबंधित यंत्रणेकडून तपासणी होणे गरजेचे आहे.

याच बोईसर-चिल्हार मार्गावर काही दिवसांपूर्वी ट्रेलरमधून तब्बल १५ ते २० टन वजनाची लोखंडी कॉइल रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने त्यावेळी मोठी जीवितहानी टळली. या घटनेनंतर अवजड लोखंडी मालाच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत रस्त्यालगत अवजड ट्रेलर उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असताना संबंधित यंत्रणा नेमकी कोणती कारवाई करणार, असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. औद्योगिक वाहतुकीला शिस्त लावणे, रस्त्यावर अवजड वाहनांचे अनधिकृत पार्किंग रोखणे आणि अपघातप्रवण ठिकाणी प्रभावी वाहतूक नियंत्रण ठेवणे हे आता पालघर जिल्हा प्रशासन तसेच वाहतूक पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.

Palghar industrial traffic
Kalyan Shil Road traffic : रक्षाबंधनच्या उत्साहावर कल्याण-शीळ कोंडीचे सावट

दरम्यान, या प्रकाराची मनोर पोलीस ठाणे आणि पालघर वाहतूक शाखेने तातडीने दखल घेऊन रस्त्यालगत उभ्या असलेल्या अवजड ट्रेलरची पाहणी करावी, वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारे रस्त्यावर अवजड वाहने उभी राहणार नाहीत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news