online gaming fraud pudhari photo
रायगड

Mumbai Crime : ऑनलाईन गेममध्ये १ कोटी २७ लाखांची फसवणूक

उरणच्या धाकटी जूई येथील तरुणाने घालविले पैसे; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

उरण : ऑनलाईन गेमिंगमधून मोठ्या आर्थिक लाभाचे आणि जिंकलेली रक्कम त्वरित मिळण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल १ कोटी २७ लाख ३१ हजार २०२ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील विंधने (धाकटी जुई) येथील रहिवासी आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शुभम रामचंद्र घरत (वय २६) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये तक्रारदाराला त्यांच्या मित्राकडून 'खेलो२४ मॅच' या ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मची माहिती मिळाली होती. अधिक लाभाच्या आमिषाला बळी पडून त्यांनी संबंधित लिंकवर जाऊन 'खेलो२४ मॅच' अ‍ॅपवर आपले अकाऊंट तयार केले.

सुरुवातीला अ‍ॅपवर अंदर-बाहर, पोकर, कॅसिनो, तीन पत्ती आणि क्रिकेट यांसारखे ऑनलाईन खेळ खेळताना कमी रकमेच्या पैज जिंकल्यानंतर विथड्रॉव्हल्स यशस्वी झाले. यामुळे तक्रारदाराचा विश्वास बसला. त्यानंतर ९ ऑक्टोबर २०२४ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत अ‍ॅपवर झालेला तोटा भरून काढण्यासाठी आणि जिंकलेली रक्कम मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया व मित्राच्या कॅनरा बँकेच्या खात्यातून क्यूआर कोड आणि यूआयपी द्वारे वारंवार विविध खात्यांवर पैसे जमा केले.

तब्बल २२० हून अधिक व्यवहारांची नोंद

तब्बल २२० हून अधिक व्यवहारांद्वारे एकूण १ कोटी २७ लाख ३१ हजार २०२ रुपये जमा करूनही त्यांना कोणतीही रक्कम परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी विविध कलमांन्वये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT