Navi Mumbai International Airport Opening Date
पनवेल: देशाच्या पायाभूत विकासाला नवी दिशा देणारा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा आयाम ठरणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) अखेर जनतेसाठी खुला होत आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे भव्य उद्घाटन होणार आहे. पीएम मोदी सुमारे दोन तासांच्या विशेष भेटीवर नवी मुंबईत थांबणार आहेत. या उद्घाटनावेळी महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवर, उद्योगजगत आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
हा विमानतळ देशातील सर्वात अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक विमानतळांपैकी एक ठरणार असून, मुंबईसह संपूर्ण महानगर प्रदेशाच्या हवाई प्रवास क्षमतेत मोठी भर टाकणार आहे.
विमानतळावर बांधण्यात आलेल्या दोन रनवेपैकी एकाचे काम पूर्ण झाले असून, प्रवाशांच्या सोयीसाठी टर्मिनल्स एकात्मिक प्रणालीद्वारे जोडलेले आहेत.
* मेट्रो स्टेशनवर थेट चेक-इनची सुविधा उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि वेळेची बचत करणारा ठरेल.
* “वन-अप एंड टू एंड बॅगेज फॅसिलिटी” नावाच्या ऍपद्वारे बॅगेजची अद्ययावत माहिती प्रवाशांना मिळणार आहे.
* विमानतळावर एकूण ३५० विमान पार्किंगची सोय असून, दोन्ही रनवेसाठी स्वतंत्र टॅक्सीवेची उभारणी करण्यात आली आहे.
या विमानतळाला पर्यावरणपूरक विमानतळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. हरित उर्जेचा वापर, पाणी बचत व जलसंधारणाच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. टर्मिनल इमारतीत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी डिजिटल आर्ट गॅलरी उभारण्यात आली आहे. याशिवाय, प्रवासी सेवा आणि ऑपरेशन्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुंबई व महाराष्ट्रातील इतर भागांशी उत्तम जोडणी व्हावी, यासाठी अटल सेतूपासून कोष्ठल रोड तसेच मेट्रो लाईन ८ या दोन्ही मार्गांद्वारे थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. याशिवाय, प्रवाशांच्या सोयीसाठी वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
या भव्य प्रकल्पाचा एकूण खर्च तब्बल १९ हजार ६०० कोटी रुपये असून, यातील ३ हजार ५०० कोटी रुपये सिडकोने लँड डेव्हलपमेंटसाठी खर्च केले आहेत. विमानतळाचे काम चार वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पुढील काळात ठाणे विमानतळाच्या कामालाही गती दिली जाणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या हवाई वाहतूक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. मुंबई विमानतळावरील ताण कमी होऊन नवे आर्थिक व औद्योगिक विकासाचे मार्ग खुलणार आहेत. हा प्रकल्प केवळ वाहतुकीपुरता मर्यादित न राहता भारताच्या प्रगतिशील विकासाचे नवे प्रतीक म्हणून उभा राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला वेग येणार असून, जागतिक दर्जाच्या विमानतळांच्या यादीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव अढळपणे कोरले जाईल, असा आत्मविश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.