रायगड : रायगड जिल्ह्यात लायन्स क्लबचे कार्य उत्तमरित्या चालले आहे. अलिबाग, मांडवा, पोयनाड आदी लायन्स क्लबने सेवेचा आदर्श निर्माण केला आहे. लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या चोरोंडे येथील निर्माणाधीन हॉस्पिटलसाठी आणि इतरही काही मदत लागल्यास ती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपण तत्पर असू असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी केले. निसर्गबंध उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 1500 झाडांची मियावाकी पद्धतीने लागवड करण्यात आली असून, पुढील टप्प्यात 5 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
लायन्स क्लब ऑफ अलिबाग मांडवाच्या वतीने आयोजित निसर्गबंध वृक्षारोपण 2025 या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा आणि जलसंधारणासाठी चेक डॅम भूमिपूजन सोहळा मंगळवार, 30 सप्टेंबर रोजी अलिबाग तालुक्यातील चोरोंडे येथील क्रिकेट मैदानावर रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या उपक्रमाने जिल्ह्यातील रिजन 4 च्या लायन्स क्लबच्या ऑक्टोबर सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील 13 लायन्स क्लब सहभागी झाले होते, ज्यामुळे या पर्यावरणपूरक चळवळीला एका भव्य उपक्रमाचे स्वरूप प्राप्त झाले. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच, लायन्स क्लबचे जिल्हा प्रांतपाल संजीव सूर्यवंशी, प्रथम उपप्रांतपाल प्रवीण सरनाईक, द्वितीय उपप्रांतपाल विजय गणात्रा यांसह डिस्ट्रिक्ट ऍडव्हायझर अनिल जाधव, जी.एस.टी.को-ऑर्डिनेट आर.पी. पांडे, रिजन चेअरपर्सन गिरीश म्हात्रे, प्रियदर्शिनी पाटील आणि झोन चेअरपर्सन विकास पाटील यांचीही उपस्थिती होती.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन आणि प्रायोजकत्व लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबागचे उपाध्यक्ष व डिस्ट्रिक्टचेअरपर्सन (पर्यावरण) नितीन अधिकारी यांनी केले. या सर्वांनी यावेळी जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली आणि हा प्रकल्प भावी पिढ्यांसाठी हरित आणि सुरक्षित भविष्य निर्माण करण्यास प्रेरणा देईल, असे मत मांडले.
निसर्गबंध उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 1500 झाडांची मियावाकी पद्धतीने लागवड करण्यात आली असून, पुढील टप्प्यात 5000 झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यात सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग घेतला. चोरोंडे क्रिकेट ग्राऊंडवर आयोजित या कार्यक्रमात जिल्ह्यातील रिजन 4 च्या 13 लायन्स क्लबचे सुमारे 150 सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमीत पाटील यांनी केले. लायन्स क्लब ऑफ अलिबाग मांडवा नेहमीच विविध सामाजिक कामांमध्ये अग्रेसर राहिला असून, हा निसर्गबंध उपक्रम पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक नवा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.
पाण्याचे होणार शाश्वत नियोजन
केवळ झाडे लावून न थांबता, त्यांच्या योग्य संवर्धनासाठी नयन कवळे यांच्या सहकार्याने चेक डॅमचे भूमिपूजन देखील करण्यात आले. या चेक डॅममुळे वर्षभर पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होईल, ज्यामुळे झाडांचे संवर्धन आणि पाण्याचे शाश्वत नियोजन यांचा दुहेरी उद्देश साध्य होणार आहे.