तिसऱ्या मुंबई निर्मितीसाठी सिडकोचे लक्ष pudhari photo
रायगड

CIDCO NAINA project progress : तिसऱ्या मुंबई निर्मितीसाठी सिडकोचे लक्ष

पाच गावांचे सर्वेक्षण पूर्ण, नियोजनशैलीतून संवादकेंद्रित दृष्टिकोन

पुढारी वृत्तसेवा

खारघर : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर ‌’तिसरी महामुंबई साकारण्यासाठी आखलेल्या नैना प्रकल्पाला अखेर गती मिळू लागली आहे. 2013 पासून अस्तित्वात असलेल्या या प्रकल्पाने गेल्या बारा वर्षांत अनेक प्रशासकीय अडथळे, शेतकऱ्यांचा अविश्वास आणि नियोजनातील विस्कळीतपणा अनुभवला. मात्र, आता सिडको महामंडळाने नव्या नियोजनशैलीतून आणि संवादकेंद्रित दृष्टिकोनातून प्रकल्पाचा पाया पुन्हा दृढ करण्यास सुरुवात केली आहे. नैना क्षेत्रातील पहिल्या पाच गावांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

नांदगाव, देवद, कुडावे, उसर्ती आणि वडवली पा गावांमधील जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. 46 गावांचा समावेश असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेत शहर नगर नियोजन क्रमांक 1 ते 12 सिडकोने जाहीर केली असून, पुढे गावनिहाय संवाद साधून सर्वेक्षण पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या चमूने नवी मुंबई विमानतळ प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर नैना प्रकल्पाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी या योजनेची जबाबदारी सह-व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांच्याकडे सोपवली असून, मुख्य नियोजनकार आशुतोष उईके यांच्या समन्वयातून भूमापन, अभियांत्रिकी आणि भूमिअभिलेख विभाग सुसंवादात काम करत आहेत.

नांदगावमध्ये सर्वेक्षणानंतर रस्ता मार्किंगचे काम सुरू झाले असून, लवकरच प्रत्यक्ष रस्ते बांधकाम सुरू होणार आहे. सिडकोने टीपीएस योजनांपेक्षा गावनिहाय संवादाची रणनिती स्वीकारल्याने भूधारकांकडूनही सहकार्य वाढले आहे.

शेतकऱ्यांचा विश्वास वाढविणार

सिडकोने यावेळी नव्या दृष्टिकोनातून गावागावांत जाऊन शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या मालमत्तांचे प्रॉपर्टी कार्ड, गावठाण आणि विस्तारित गावठाणांमधील बांधकामांचे संरक्षण, तसेच पायाभूत सुविधांच्या निविदा प्रक्रियेसंबंधी अनेक वर्षांपासूनची कोंडी यामुळे असलेला अविश्वास आता दूर होत आहे. सर्वेक्षणामुळे 200 मीटर विस्तारातील गावठाण बांधकामांना संरक्षण सिळणार असल्याने गावकऱ्यांचा प्रतिसाद सकारात्मक दिसत आहे.

प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सनदशीर मार्गाने सोडवून प्रकल्पाची गती कायम ठेवली जाईल. येथील आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्यासह शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी साधलेल्या संवादामुळे शेतकऱ्यांचे सहकार्य मिळत आहे.
शांतनू गोयल, सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT