मुरुड जंजिरा : मुरूड एसटी आगारात सीएनजी गॅस पंप उपलब्ध नसल्याने मुंबई-पुणे धावणाऱ्या एस.टी. बसेसना अलिबाग वा अन्यत्र गॅस भरावा लागत आहे. परिणामी प्रवाशांचा खोळंबा होत असुन नियमित वेळेवर बसेस पोहचू न शकल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे. तेव्हा मार्ग महामंडळातर्फे मुरुड आगारात सीएनजी गॅसपंप कार्यान्वित व्हावा ही मुरुडकरांची वाजवी मागणी आहे. तथापि सदर मागणी पुर्ण होऊ शकणार नाही असे कळल्याने सीएनजी गॅसपंप सुरु होण्याची शक्यता आता धुसर झाली आहे.
मुरूड-जंजिरा हे कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र असून ऐतिहासिक जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग, समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य आणि येथीलसमृद्ध खाद्यसंस्कृतीच्या आकर्षणामुळे दरवर्षी लाखो पर्यटक येथे वर्षभर येत असतात.त्यातून सर्वच पर्यटक खासगी वाहनांना येतात असे नाही. बरेचशे पर्यटक सुरक्षित प्रवासाची हमी असलेल्या लालपरीला पसंती देतात. मात्रअशा ठिकाणी सीएनजी पंपाचा अभाव असल्याने मुरूड आगारातील एसटी बस सेवेच्या वेळा जुळवतांना मोठ्या अडचणींचा सामना करावालागत असल्याचे चित्र आहे.
मुरुड आगारात आतापर्यंत 7 नवीन बसगाड्या सोडल्यातर उर्वरित 30 गाड्या या सीएनजी वरच धावत असून गॅस भरण्यासाठी त्यांना अलिबाग वा अन्यत्र थांबण्याखेरीज गत्यंतर नसल्याने वाहक-चालकांना प्रवाशांकडून शेलके संवाद ऐकायला मिळतात त्यामुळे कधीकधी बाचाबाचीचे प्रसंग येतात. हे टाळण्यासाठी वाहन चालकांकडून पुढे जाणाऱ्या प्रवाशांना गाडी अलिबाग ला किमान अर्धा तास तरी गॅस भरण्यासाठी थांबेल अशी सूचना देत असल्याने प्रवाशी मुरुडवरून अलिबागपर्यंतच तिकीट काढून नवीन बसने प्रवास आरंभ करतात. त्यामुळे मुरुड आगाराचे भारमान कमी होते. ही बाब महामंडळ लक्षात घेणार आहे किंवा नाही हा सवाल आहे.
गॅस भरायला गाडी जाते त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो, प्रवाशांचा खोळंबा होतो आणि मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांना नाईलाजाने अर्धा अर्धातास प्रतीक्षा करावी लागते. याचा थेट परिणाम प्रवासी संख्येवर होत असून, वाहक-चालकांवर प्रवाशांचा रोष वाढतो. त्यामुळे वाहक आणिचालकांची मानसिकता बिघडू शकते.
मुरूडला जागतिक पर्यटन नकाशावर आणणे आणि सागरकिनाऱ्याला ब्लू फ्लॅग मानांकन मिळवणे, अशा घोषणांमुळे पर्यटनवाढीची अपेक्षा व्यक्त होत असली, तरी मूलभूत पर्यटनपूरक सुविधा गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचे चित्र आहे. जून 2025 मध्ये मुरूड आगारात पाच नवीन बसचे लोकार्पण आ.महेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले होते. यावेळी आणखी पाच बस देण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र नव्याने दोनचबस गाड्या दाखल झाल्याची माहिती आहे.तरी मुरुडसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळी सीएनजी गॅस पंप तातडीने सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू पहात आहे. जिल्ह्यात माणगाव, श्रीवर्धन सारख्या ठिकाणी गॅसपंप सहजी मंजुर केला जातो आणि मुरुड ला नकार घंटा ही भूमिका सापत्न वाटणारी आहे.
महानगर गॅस कंपनीकडे मुरुड आगाराचा सीएन जी गॅस पंपाचा प्रस्ताव पाठवला होता, परंतु मुरुडला सीएनजी पंप देतांना 30 गाड्यांसाठी पंप देता येत नसल्याचे कारण सांगुन महानगरकडून हा प्रस्ताव नांमजूर करण्यात आलाआहे.सुहास चौरे, पेण विभाग नियंत्रक