मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यातील उसरोल ग्रामपंचायत भागातील खारीकवाडा परिसरात आज सकाळी दहा वाजता आग लागल्याने दोन घरांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
खारीकवाडा परिसरातील रमेश हरीचंद्र पाटील यांच्या पत्नी मंदा पाटील या आज सोमवार असल्याने सकाळच्या प्रहरी देवासमोर दिवा लावून भगवान शंकर येथील मंदिरात अभिषेक घालण्यासाठी गेल्या होत्या. परंतु आज सकाळी दहा वाजता दिव्याने पेट घेतल्याने हळूहळू आग वाढत जाऊन ती छप्पर पर्यंत पोहचली. खारीकवाडा परिसरात जवळ जवळ घरे असल्याने या घराला लगत असणारे घर प्रभाकर हरीचंद्र पाटील यांच्या सुद्धा घराला आग लागली. घरातील माणसे बाहेर असल्याने ही बाब लक्षात आली नाही.
परंतु कौलातून धूर येऊ लागल्याने असंख्य मदतीचे हात धावून आले. आगरी समाज खारीकवाडा , परीट समाज तसेच मुस्लिम समाज सुद्धा आग विझविण्यासाठी धावून आला. तातडीने दखल घेतल्याने सदरची आग आटोक्यात आली. यावेळी सदरचे वृत्त श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर नांदगाव येथे हे वृत्त समजताच या शाळेतील इयत्ता नववी दहावीचे चे विद्यार्थी व शिक्षक हे सुद्धा या ठिकाणी पोहचून आग विझविण्यासाठी मोलाची मदत केली.
मुरुड नगरपरिषद अग्निशामक दल सुद्धा येथे आले होते परंतु वेळीच आग विझल्याने त्यांना विशेष मेहनत करावी लागली नाही. या घरातील गृहिणी मंदा ताई यांना सदरचे वृत्त समजताच त्या धावत धावत त्यांनी घर गाठले. यावेळी एका लोखंडी पेटीमध्ये प्लास्टिक डब्याच्या आत त्यांनी 15 हजार रुपये ठेवले होते. या आगीत लोखंडी पेटी असताना सुद्धा पेटीमधील कागद पत्रे जळाली परंतु प्लास्टिक डबी जळून अर्धी झाली.
सदर महिलेने या डबीमध्ये पैसे असल्याचे सांगताच शिक्षक सागर राऊत व ग्रामस्थ काशिनाथ गिरणेकर अन्य लोकांनी ही डबी कापून काढली व सुखरूप ते पॉकेट काढले. 15 हजार रुपये जसे होते तसे प्राप्त झाल्याने महिलेस मोठा धीर मिळाला. आग लागताच तातडीने लोकांची मदत मिळाल्याने आग आटोक्यात येऊन होणारे जास्तीचे नुकसान टळले आहे.