Car Accident Pudhari
रायगड

Car Accident: कनेक्टिंग लिंकवरील व्हॅली ब्रिजवर तीन कारचा अपघात

या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

खोपोली: मुंबई–पुणे कॉरिडॉरच्या कनेक्टिंग लिंक मार्गावरील व्हॅली ब्रिज येथे किमी 03/600 या ठिकाणी बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान तीन कारचा साखळी अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

फॉर्च्यूनर , वेरणा आणि कार ही वाहने मुंबईहून पुण्याकडे जात असताना किमी 03/600 वरील व्हॅली ब्रिज परिसरात आली असता हा अपघात घडला. यातील फॉर्च्यूनर कार अचानक तिसऱ्या लेनमध्ये थांबल्याने मागून येणाऱ्या वेरणा कारने तिला धडक दिली. त्यानंतर वेरणा कारच्या मागून येणाऱ्या कारने वेरणाला धडक दिल्याने साखळी अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाटचे अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधित यंत्रणांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ मदतकार्य हाती घेत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला हलवली.या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.

मात्र यंत्रणांच्या तत्पर कार्यवाहीमुळे वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात आली. अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. महामार्गावर वाहन चालविताना सुरक्षित अंतर राखणे, अचानक ब्रेक न मारणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT